कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ काल (ता. 3) पुकारलेल्या कोल्हापूर बंदमध्ये ज्या महिलेची साहित्याने भरलेली टपरी उलथवली, त्या कुटुंबावर आज मदतीचा पाऊसच पडला. शहराबरोबरच पुणे, दिल्ली, मुंबई येथूनही या कुटुंबाला मदत करण्याची तयारी अनेकांनी दर्शवली. काही दानशुरांनी त्या महिलेच्या हातातच रोख रक्कम व साहित्यही देऊन दातृत्त्वात कोल्हापूरकर कमी नाहीत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.
काल पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. त्यात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दिसेल ते वाहन आणि इमारतीवर तुफान दगडफेक केली. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला लावलेल्या व बंद असलेल्या टपऱ्याही हुल्लडबाज तरूणांनी उलथवून टाकल्या. अशाच एका घटनेत रेल्वेस्थानक परिसरातील श्रीमती शोभा गायकवाड यांची साहित्याने भरलेली टपरी उलथवून टाकली होती.
श्रीमती गायकवाड यांनी दोन दिवसांपुर्वी घरमालकांकडून दहा हजार रूपये उसने घेऊन टपरीत अंडी, तेल, चहाला लागणारे साहित्य, पानपट्टीचा माल भरला होता. कालच्या घटनेत हे सर्व साहित्याचे नुकसान झाले. दोन मुलांना घेऊन व्यवसाय करणाऱ्या या महिलेवर या घटनेने आभाळच कोसळले. घटनेने हतबल झालेली ही महिला दोन्हीही मुलांसह सकाळपासून मध्यरीत्रपर्यंत या टपरीजवळच बसून होती.
"आम्ही कोल्हापुरी' या ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण साहित्य या कुटुंबाला घेऊन दिले. त्यात 12 डझन अंडी, तेलाचा डबा, साखर, चहापूड, खुर्ची यांचा समावेश होता. "आम्ही कोल्हापुरी' चे हर्षल सुर्वे, आशपाक आजरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मदत दिली. त्यानंतर हिंदुत्त्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बंडा साळोखे, महेश उरसाल यांनीही या कुटुंबाला मदत देण्याची तयारी दर्शवली. एक मोडलेला संसार घटनेनंतर 24 तासात उभा राहीला.
जिल्ह्याबाहेरूनही मदतीचा ओघ कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती तर या कुटुंबासाठी पुढे आल्याच पण मुंबई, पुणे, दिल्ली येथूनही अनेकांनी या कुटुंबाची बातमी वाचून मदतीची तयारी दर्शवली. पुण्यातील एका व्यक्तीने तर या कुटुंबाला 50 हजार रूपये देण्याची तयारी दर्शवली.
إرسال تعليق