मुंबई : राजकीय होर्डिंगवर नेत्यांपुढे राव, दादा, भाई, भाऊ विशेषण लावण्याची परंपरा प्रत्येक गल्लीत पाळली जाते. शिवसेनेत तर भाई आणि भाऊंची रेलचेलच. मात्र, आता शिवसेनेतील भाईगिरी संपणार आहे. तसे आदेशच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यावर कार्यकर्त्यांना दिले असल्याचे समजते.
शिवसेनेत बहुतांश नेत्यांपुढे भाई आणि दादा लावण्याची प्रथा आहे. त्यानंतर आता राव, साहेब अशी विशेषणेही लावली जातात. या प्रथेवर आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नावापुढे भाई, भाऊ, दादा, साहेब आणि राव अशी विशेषणे लावू नयेत, असे सक्त आदेशच त्यांनी दिले आहेत. या आदेशानंतर होर्डिंगवर अशी विशेषणे लावलेली दिसताच होर्डिंग लावणाऱ्यांवर पक्षामार्फत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावू नये, असे आदेश आदित्य ठाकरे दरवर्षी देतात. मात्र, तरीही होर्डिंग लावले जातात. आता त्यांची शिवसेनेतील सर्वांत महत्त्वाच्या म्हणजे नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशांचे पालन किती गांभीर्याने होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
إرسال تعليق