'शिवसेनेत माझ्यासारखा सामान्य कार्यकर्तासुध्दा राज्याचा मुख्यमंत्री झाला. लोकसभा अध्यक्षही झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दाखविलेला विश्वास आणि सामान्य कार्यकर्त्यांनी दिलेली साथ त्यामुळेच ही पदे मला भूषविता आली. ही पदे मला मिळतील, असे कधी वाटले नव्हते. परंतु, प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. एक सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होऊ शकतो हे एकनाथ शिंदे यांचा प्रवास पाहिल्यानंतरही स्पष्ट होते. त्यामुळेच शिवसेना नेते हे मानाचे पद तुम्हाला मिळाले आहे. आता यापुढेही प्रयत्न करीत रहा. जिद्द सोडू नका. एक दिवस तुम्हीसुध्दा मुख्यमंत्री व्हाल', अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते त्यांचा नागरी सत्कार झाला. ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळाच्या मैदानात झालेल्या या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर जोशी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. शिंदे यांना कामाच्या जोरावर शिवसेना नेतेपद बहाल करण्यात आले आहे. सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यानंतर शिवसेनेला ठाण्यात उभारी देण्यात शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे, असेही जोशी म्हणाले. एकनाथ शिंदे यांना बघितल्यानंतर लगेचच कामे होतात. त्यांना दाढी आहे. या दाढीला घाबरून कामे वेगाने होत असतील, अशा मिश्किल शब्दात त्यांनी कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुशासन पाळल्याने त्यांना यश मिळाले. आयुष्यात जो अनुशासन पाळतो नेहमी पुढे जातो. शिंदे याांच्याकडे ते अनुशासन असल्याने त्यांची नक्कीच प्रगती होईल. ठाणेकरांकडून त्यांचा झालेला हा सत्कार नसून तो कृतज्ञता सोहळा असल्याचे मत यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. आज माझ्या नव्हे तर दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याहस्ते हा सत्कार व्हायला हवा होता. मात्र, ते हयात नाहीत अशी खंतही बाबासाहेबांनी व्यक्त केली.
मी आजही कार्यकरताच.
मी आज जो कुणी आहे तो केवळ कार्यकर्त्यांमुळेच आहे. कार्यकर्ते हेच माझे बळ असून मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो. मी मंत्री आहे, नेता आहे असे जेव्हा माझ्या मनात येईल, तेव्हा मी कार्यकर्त्यापासून लांब गेलो असेन, असे प्रतिपादन शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. राजकीय जीवनात कौतुक जसे होते, तशी टीका होते. टीका झाली तर डगमगू नका पुढे चालत रहा आणि यश आले तर ते त्या यशाने हरळून जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. अनुशासन शिस्त, नियोजन असेल तर तुमच्या आयुष्यात अवघड असे काहीच नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजळा दिला.
إرسال تعليق