सामना प्रतिनिधी । नागोठणे
रोहे तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादी, शेकाप तसेच भाजपला पराभवाचा ‘शिमगा’ दाखवत शिवसेनेने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवला तर पहिल्यांदाच जनतेतून झालेल्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत शिवसेनेचे डॉ. मिलिंद धात्रक हे विजयी झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याने नागोठणेकरांनी विकासालाच कौल दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या रणधुमाळीत ४२ उमेदवारांनी उतरत निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती, पण शिवसेनेने स्ट्रीट लाइट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान, रस्ते, पेव्हर ब्लॉक तसेच अन्य विकासाची भरीव कामे गेल्या पाच वर्षांत केल्याने पुन्हा एकदा भगवाच फडकेल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. त्याचाच प्रत्यय आज जाहीर झालेल्या निकालातून आला. सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेत विरोधकांना पराभवाची धूळ चारली. १७ पैकी तब्बल ११ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. सरपंचपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेचे डॉ. मिलिंद धात्रक यांनी जोरदार यश मिळवत ‘विजयश्री’ खेचून आणली. प्रभाग ५ मधून शैलेंद्र देशपांडे यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवत आपली राजकीय शक्ती दाखवून दिली आहे.
विकासाला नागोठणेकरांनी दिलेला हा कौल आहे
नागोठणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेला एकहाती सत्ता देऊन आमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही. विकासाला त्यांनी दिलेला हा कौल असून यापुढेही शहराचा कायापालट करण्यासाठी ठोस नियोजन केले जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर जैन यांनी दिली.
गद्दारांना ‘कात्रज’चा घाट
ऐन निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या वळचळणीला गेलेले विलास चौलकर व प्रकाश मोरे यांना मतदारांनी ‘कात्रज’चा घाट दाखवला. सरपंचपदासाठी उभे राहिलेले विलास चौलकर यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांच्या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.
إرسال تعليق