वाढत्या वयामुळे शिवसेनाप्रमुखांना राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना 2009 च्या निवडणुकीत सभा घेता आल्या नव्हत्या. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ते दरवर्षी संबोधित करायचे. अर्थात प्रकृतीमुळे त्यांना सभेच्या ठिकाणी येता यायचं नाही. मात्र त्यांचं रेकॉर्डेड भाषण सभेच्या ठिकाणी दाखवलं जायचं. 2012 च्या दसरा मेळाव्यात त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे अखेरचं मार्गदर्शन ठरलं. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचं रेकॉर्डेड भाषण दाखवण्यात आलं होतं. या भाषणाने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांचं डोळे पाणावले. "मला सांभाळलत, उद्धव आणि आदित्यलाही सांभाळा" शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द ऐकून सगळी सभा निस्तब्ध झाली. अंगार चेतवणा-या शिवसेनाप्रमुखांचे हे शब्द नेहमीचे नव्हते. शिवसेनाप्रमुखांना ओळखणा-या शिवसैनिकांना त्यांची ठाकरी भाषा माहित होती. आणि हे शब्द त्यांच्या ठाकरी भाषेतले नव्हते. ही वेगळी भाषा ऐकून शिवसैनिकांच्या काळजाच्या ठिक-या उडाल्या होत्या.
यंदाही दस-याच्या दिवशी मुंबई भगव्या ध्वजांनी सजेल. मात्र मुंबईतल्या कलानगरमध्ये असणारा शिवसैनिकांचा विठ्ठल शिवसैनिकांना दिसणार नाही. कारण तिथल्या देव्हा-यातला देव इहलोकीच्या यात्रेला गेला आहे. या जगात शाश्वत असं काहीच नाही. त्याला कुणीच अपवादही नाही. मात्र सगळ्यांच्याच मनात एकाच नेत्याच्या आठवणीचा स्मृतीगंध दरवळत रहावा असा एक अपवाद आहे, आणि तो अपवाद म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
إرسال تعليق