'मला पळपुटा म्हणून अनिल गोटेंनी माझा नाही तर भारतीय सैन्याचा आपमान केला आहे. मी पळपुटा असतो तर पाकिस्तानातून परत आल्यावर मला भारतीय सैन्याने स्वीकारलंच नसतं. तीन महिने २१ दिवस मी पाकिस्तानात होतो. त्यानंतर ८९ दिवस लष्करी चौकशीला सामोरं गेलो आहे. त्यानंतर लगेच सैन्यात रूजू झालो आहे. जीव मुठीत धरून लढणाऱ्या सैनिकांची गोटेंना काहीच किंमत नाही,' अशा शब्दांत पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाण यानं आपला संताप व्यक्त केला आहे. या आरोपांना कंटाळूनच त्यानं लष्करी सेवेतून बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
२०१६साली उरी हल्ल्याच्या दरम्यान नजरचुकीनं चंदू चव्हाण हा जवान सीमा पार करून गेला होता. चंदूला पाकिस्तानच्या तावडीतून सोडवण्यासाठी संरक्षण खात्याचे राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर पाकिस्तानने जानेवारी २०१७मध्ये चंदूला सोडलं. मात्र, धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी चंदूला पळपुटा सैनिक संबोधलं होतं. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंना तसं पत्रच त्यांनी लिहिलं होतं.
गोटेंची ही टीका चंदू चव्हाण याच्या जिव्हारी लागली आहे. 'एका लोकप्रतिनिधीकडून हे अपेक्षित नाही. कोट्यवधीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात ५ वर्षे तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका राजकारण्याकडून अजून काय अपेक्षा करणार?,' असा संतापही चंदूने व्यक्त केला आहे.
पाकिस्तानातून भारतात आल्यावर चंदूच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्याच आहेत. त्याची तीन महिने चौकशी करण्यात आली. परवानगीशिवाय शस्त्रांसह कॅम्प सोडला म्हणून शिक्षाही सुनावण्यात आली. पाकिस्तानी तुरूंगात राहून त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने गेले काही दिवस तो खडकीच्या रूग्णालयात उपचार घेत होता. खडकीच्या रुग्णालयातील त्याचे उपचार पूर्ण झाले असून तो आता धुळे जिल्ह्यात त्याच्या गावी परतला आहे.
सततच्या चौकशा आणि राजकीय आरोपांना चंदू कंटाळलेल्या चंदूनं सैन्य सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'मला आता एका सामान्य माणसाचं आयुष्य जगायचं आहे,' असं त्यानं म्हटलंय.
إرسال تعليق