भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी असून त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत, अशा शब्दात शिवसेनेने संभाजी भिंडे गुरुजी यांना पाठिंबा दर्शवला आहे.
माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य केल्याने श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. हा वाद ताजा असतानाच शिवसेनेने मंगळवारी 'सामना'च्या अग्रलेखातून संभ भिडे यांच्या अहमदनगरमधील विधानाचे कौतुक केले. नगर येथील एका सभेत भिडे गुरुजी यांनी तरुणांना असे आवाहन केले की, हाती तलवारी घेण्याची वेळ नक्कीच येणार आहे, तयार रहा, या विधानाकडे लक्ष वेधत शिवसेनेने पुढे म्हटले की, हिंदुत्वासाठी भिडे गुरुजींची अखंड धडपड सुरू असते. हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडे असल्याने त्यांनी हाती तलवारी घेऊन लढण्याची गर्जना केली. पण भिडे गुरुजींना ही जय्यत तयारी करावीशी वाटते म्हणजेच कोणत्या तरी संकटाची जाणीव त्यांना अस्वस्थ करत असल्याचे शिवसेने म्हटले आहे.
भीमा- कोरेगाव दंगलीसंदर्भात पाच- सहा माओवादी सूत्रधार पुणे पोलिसांनी पकडले आहेत. ती लोकं अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेण्याची तयारी करत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. अशा लोकांपुढे आपल्या तलवारी कशा टिकणार?, असे शिवसेनेने संभाजी भिडे यांना उद्देशून म्हटले आहे.
भिडे गुरुजींचा प्रवास तलवारीच्या धारेवरून सुरू असतो. पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
إرسال تعليق