शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाम हिंदू बांधवांच्या मनावर राज्य करणाऱ्या बाळासाहेबांसारख्या प्रभावी नेत्याची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त खासदार संजय राऊत, नवाजुद्दीन आणि कार्निव्हल ग्रुपचे संस्थापक डॉ. श्रीकांत भासी यांनी एकत्र येत या चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
या भूमिकेसाठी नवाजुद्दीन बरीच मेहनत घेत आहे. 'बाळासाहेबांच्या भूमिकेच्या शिवधनुष्याचा भार पेलवणार की नाही या विचारांत आजही अनेक रात्र न झोपता जातात,' असं नवाजुद्दीन म्हणाला. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच नवाजुद्दीनचा विचार केला होता. तर पहिल्या भेटीतच तो ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकेल असा विश्वास मनात निर्माण झाल्याचं राऊत यांनी सांगितलं. 'बाळासाहेबांनी सामान्य माणसातला सुपरमॅन जागा केला. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचं जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटलं जावं तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचंच,' असं राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
إرسال تعليق