मुंबई : 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली आहे. 'काशिनाथ घाणेकर' चित्रपटासाठी शिवसेनेने मुंबईतील बोरिवलीत असलेल्या 'सोना गोल्ड' चित्रपटगृहासमोर 'दे धक्का' आंदोलन केलं.
मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार अर्थात हरहुन्नरी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्याच्या विविध भागात हा सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी या सिनेमाला प्राईम टाईम मिळत नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी होती.
'काशिनाथ घाणेकर' चित्रपटाला सिनेमागृहात पुरेसे शो मिळत नसल्यावरुन काही दिवसांपूर्वी मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. कल्याण, गिरगावमधील चित्रपटगृहात जाऊन मनसेने निवेदनं दिली होती. त्यानंतर
विशेष म्हणजे, 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट शाखेच्या उपाध्यक्ष पदावर आहेत. मात्र, 'घाणेकर' ऐवजी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या हिंदी चित्रपटाला सिनेमागृहातील प्राईम टाईम शोज दिले असतानाही शिवसेना गप्पच होती.
मनसेने सुबोध भावेंच्या चित्रपटाच्या बाजूने आंदोलन छेडल्यावर शिवसेनेनेही आता यात उडी घेतली. 'दे धक्का' हे आंदोलन आमदार प्रकाश सुर्वे आणि विलास पोतनीस यांच्या नेतृत्वात झाले.
प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारत आहे. त्याशिवाय आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, नंदिता पाटकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिजीत शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे.
إرسال تعليق