औरंगाबाद : कष्टकरी, मोल-मजुर आणि गरीबाच्या पोटाला पोटभर अन्न मिळावे या हेतूने औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने दहा रुपयांत जेवण देण्याचा उपक्रम " शिव भोजन' योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पुढाकार घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात " शिव भोजन' गाडा सुरू केला असून या माध्यमातून रोज अडीचशे ते तीनशे जणांना भोजनाचा लाभ दिला जात आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली एक रुपयात झुणका-भाकर योजना यशस्वीपणे राबविण्यात आली होती. लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यानंतर मुंबईत देखील शिवसेनेच्या वतीने स्वस्तात "शिव वडापाव' उपक्रम राबवण्यात आला होता. आता औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने "शिव भोजन' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 27 जुलै पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसापासून शहरातील अभिनय टॉकीज चौकात दुपारी साडेअकरा ते अडीच या वेळेत शिव भोजनची गाडी लावण्यात येते.
केवळ दहा रुपयात मोंढ्यातील मजुर, कष्टकरी व गोर-गरीबांना एक भाजी, तीन पोळ्या, भात, खिचडी, पुलाव, मसाले भात यापैकी एक आणि स्वीट असे पोटभर जेवण दिले जाते. विशेष म्हणजे हा गाडा रोज अखंडपणे लावला जातो. दहा रुपयात ताजे आणि रुचकर भोजन मिळत असल्याने "शिव भोजन'ला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आणखी तीन ठिकाणी सुरू करणार
"शिव भोजन' संदर्भात बोलतांना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ही शिकवण स्मरणात ठेवून त्याप्रमाणेच आम्ही वाटचाल करतो. ही योजना सुरू करण्यामागे उपाशी पोटी कुणी राहू नये हीच भावना होती. शिव भोजन घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने तृप्तीचा ढेकर दिला की आम्हाला समाधान मिळते. शिवभोजनचा गाडा लावण्यासाठी आम्ही अशा चौकाची निवड करत आहोत, जेणेकरून काबडकष्ट, मेहनत, मजुरी करणाऱ्या गरजूंना खऱ्या अर्थाने याचा लाभ व्हावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 23 जानेवारीला जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेंट्रल बसस्थानक इथे "शिव भोजन' गाडा सुरू करण्यात येणार आहे.
إرسال تعليق