कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असताना बंद असलेल्या दुकानावर तुफान दगडफेक, पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड, दसरा चौकात लावलेल्या केएमटी बसवर दगडफेक, रस्त्यावर जाणाऱ्या नागरीकांना त्रास यासारखे प्रकार वाढल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. 
श्री. क्षीरसागर यांनी शहराच्या मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली, ही रॅली ज्यावेळी समोरासमोर आली त्यावेळी चकमक उडाली, पोलिसांनी वेळीच हस्तेक्षप करून हा तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर सिध्दार्थनगरवर चाल करून निघालेल्या हिंदुत्त्वववादी कार्यकर्त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मोर्चा दरम्यान घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ श्री. क्षीरसागर यांनी उद्या (ता. 4) कोल्हापूर बंदची हाक दिली पण सायंकाळी हा निर्णयही मागे घेण्यात आला. सामान्य लोकांचे हाल होऊ नयेत यासाठीच बंद मागे घेतल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 
दलित संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतर शहराच्या विविध भागातून कार्यकर्ते बिंदू चौकात जमू लागले. सुरूवातीला घोषणाबाजी व जयजयकार सुरू असलेल्या या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले. शहराच्या चौहोबाजूंनी आलेले कार्यकर्ते दसरा चौक, बिंदू चौकात एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडून बंद व काचेचे शोरूम असलेल्या दुकानावर दगडफेक, लावलेल्या वाहनांची मोडतोड, बंद ठेवलेल्या केएमटी बसवर दगडफेक, एका दैनिकाच्या कार्यालयावर हल्लाबोल यासारखे प्रकार सुरू झाले. दुपारी एक वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. शाहुपुरी परिसरात तर दारात लावलेल्या व झाकून ठेवलेल्या चारचाकीवर कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर मात्र हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते शिवाजी चौकात जमू लागले. आमदार क्षीरसागर यांनी त्यांचे नेतृत्त्व केले. कार्यकर्त्यांसोबत क्षीरसागर यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली. ही रॅली व आंदोलनकर्ते लक्ष्मीपुरी, दसरा चौक, टाऊन हॉल चौकात आमनेसामने आले, त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पण पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. 
त्यानंतर हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव टाऊन हॉल चौकात बसून होता. हा जमाव सिध्दार्थनगरवर चाल करण्याची शक्‍यता होती. त्यामुळे मोठा बंदोबस्तही होता. त्याचवेळी दोन-अडीच हजार कार्यकर्ते सिध्दार्थनगरवर चाल करू लागले. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले, पण तोपर्यंत दगडांचा खच या परिसरात पडला होता. पोलिसांनी नंतर अश्रुधुरांची नळकांडी फोडून, लाठीमार करून या कार्यकर्त्यांना पांगवले. 

Post a Comment

أحدث أقدم