कोल्हापूर : घरी अठराविश्व दारिद्रय, त्यात करत्या पुरूषाचा अकाली मृत्यु, पोटाला एक मुलगी आणि मुलगा, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही अशा परिस्थितीत अंडा बुर्जीची टपरी रेल्वेस्थानकावर उभी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू. पैसे नाहीत म्हणून आठ दिवस ही टपरी बंद, कालच घरमालकांकडून दहा हजार रूपये उसने भरून लागणारा माल भरला, पण आजच्या आंदोलनात आंदोलकांनी बंद असलेली ही टपरीच उलटून टाकली. अंडी रस्त्यावर पडून फुटली, इतर माल रस्त्यावर पडला हे कमी की काय म्हणून शिल्लक असलेले साहीत्य चोरीला गेले.
रेल्वेस्थानक परिसरात हातावर पोट असलेल्या शोभा राजाराम गायकवाड यांची ही करून कहाणी. आजच्या आंदोलनात या गरीबाच्या मोडक्या कुंपणावरच आंदोलकांनी पाय पडला. क्षणात साहीत्य जमीनदोस्त झालेले पाहून श्रीमती गायकवाड ह्या धायमोकलून रडू लागल्या. मुलगा गणेश व मुलगी अंजना यांचीही अवस्था अशीच. पतीच्या निधनानंतर श्रीमती गायकवाड यांनी हिंमतीने संसार चालवण्याचा निर्धार केला. त्यासाठी रेल्वेस्थानकावर अंडा बुर्जीबरोबरच पानपट्टीचे साहीत्य विकून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. अलिकडे त्यांना मुलगा गणेश व मुलगी अंजना मदत करत होते.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक दलित संघटनांनी दिली होती. आजपासून टपरी सुरू करायची म्हणून श्रीमती गायकवाड यांनी घरमालकांकडून आठ दिवसाच्या मुदतीने दहा हजार रूपये घेतले. त्यातून व्यवसायासाठी लागणारे अंड्याचे दहा क्रेट, सिगारेट, तंबाखू याची पाकिटे खरेदी केली. आज सकाळी टपरी उघडायची पण बंदमुळे उद्यापासून ती उघडू असे म्हणत त्यांनी आणलेला माल याच टपरीत ठेवला. आज दुपारी आंदोलकांनी ही टपरीच उद्धवस्त करून टाकली. त्यामुळे आतील अंडी रस्त्यावर पडून फुटली, चहाचे ग्लास, कपबशी यांचीही वाताहात झाली. उरलेला माल चोरीला गेला, गॅस सिंलेडर, नव्या बॅटरीचेही नुकसान झाले. दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. हा प्रकार पाहून त्यांना रडूच कोसळले. सकाळपासून श्रीमती गायकवाड या टपरीजवळच डोक्याला हात लावून बसल्या, सोबत दोन्हीही मुले, मदत मागायची तर ती कोणाकडे ? आणि आमच्याच वाट्याला हे का आले ? हेच प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
إرسال تعليق