शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांच्या गटाला कोकण विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर चार महिन्यांनी या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी भगवे फेटे घालून तर शिवसैनिकांनी मुख्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून आनंद साजरा केला. या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे पालिकेतील संख्याबळ वाढले आहेच, पण शिवसेनेची राजकीय ताकदही वाढली आहे.
नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मोरे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पालिकेतील शिवसेनेच्या गटासोबत या सहा नगरसेवकांची नोंदणी व्हावी म्हणून सभागृह नेते यशवंत जाधव यांनी कोकण आयुक्तांकडे अर्ज केला होता, मात्र त्यावर आक्षेप घेत मनसेने या सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची याचिका कोकण आयुक्तांकडे दाखल केली होती. मात्र ही कायदेशीर लढाई शिवसेनेने जिंकली.
-सर्व वैधानिक समित्यांमधील शिवसेनेची सदस्य संख्या एकने वाढली.
– सर्व समित्यांमधील मनसेचे सदस्यत्व जाणार आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांचे गटनेतेपदाचेही स्वप्न भंगले आहे.
शिवसेना ९३
पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक जिंकून आले होते. चंगेज मुलतानी यांचे नगरसेवकपद बाद झाल्यामुळे राजू पेडणेकर हे नगरसेवक झाल्यामुळे ही संख्या ८५ झाली. मात्र नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे ही संख्या पुन्हा ८४ झाली आहे. अधिक तीन अपक्षांचा पाठिंबा आणि नव्याने दाखल झालेले सहा नगरसेवक असे आता शिवसेनेचे संख्याबळ ९३ झाले आहे.
إرسال تعليق