लातूर - लातुरात असलेले पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन बंद करून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येणार होते. तसेच शहरात असलेले शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करून त्याचे को-एज्युकेशनमध्ये रूपांतर करण्यात येणार होते. ही दोन्ही महाविद्यालय सुरू ठेऊन नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून ना. तावडे यांनी मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू ठेऊन नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव दाखल करावा, असा आदेश प्रधान सचिव यांना दिले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्यात येत असून त्याचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले आहे. या प्रकल्पाकरीता आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातून सहजपणे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळेच लातूर येथे असणार्‍या पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन व महिलांसाठी असलेले महिला शासकीय तंत्रनिकेतन आवश्यक असून या दोन्ही संस्थांमधून मराठवाडा व लातूर जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी प्रशिक्षित होऊ शकतात. या दोन्ही संस्थांमधून गोरगरीब, कष्टकरी व शेतकर्‍यांचे पाल्य अल्पदरात तंत्रशिक्षण अवगत करीत आहेत. या संस्था बंद पडल्यास लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेकांना तंत्रशिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते.

या निवेदनाद्वारे या दोन्ही संस्था चालू ठेऊन नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वेगळे सुरू करावे अशी मागणी करून त्याकरीता आवश्यक असलेली जमीनही शहर व परिसरात उपलब्ध असल्याचे सांगितले होते. लातूर जिल्हा व मराठवाड्यातील तरुण-तरुणींसाठी ही दोन्ही महाविद्यालये गरजेचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ना. तावडे यांनी ही महाविद्यालये पूर्ववत सुरू ठेवावे असे सांगून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी वेगळा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असा आदेश प्रधान सचिवांना दिले आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शहरातील दोन्ही तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू राहून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असल्याबद्दल जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुण-तरुणींनी व पालकांनी या दोघांचेही आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

2 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم