आधुनिक ‘वाल्यां’ना सन्मानाने आपल्या पक्षात घेण्याचा उद्योग सुरू केलेल्या भाजपचे सरकार सगळ्या गुंडापुंडाना आपले सरकार वाटू लागले आहे. तडीपार केलेल्या एका गुंडाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याची हौसही भागवून घेतल्याने जबरदस्त खळबळ उडाली आहे. गुंडाच्या वाढदिवसाला हजेरी लावणाऱ्या पोलीस शिपयावर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी कारवाई केली होती, मग आता मुख्यमंत्र्यांवर कोण कारवाई करणार असा सवाल सर्वसमान्य जनता उपस्थित करीत आहे.
राहुल चाबूकस्वार असं या गुंडाचे नाव असून त्याला संभाजीनगरमधून तडीपार करण्यात आले आहे. संभाजीनगरातील मुकुंदवाडी, जवाहरनगर आणि सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशा या तडीपार गुंडाने गृहखात्याचा भार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसून आणि त्यांच्या खुर्चीच्या शेजारी उभं रहात फोटो काढून घेतले आहेत.
जयभवानी नगर येथे राहणाऱ्या राहुल चाबुकस्वार याची परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दरोडा, जवाहर नगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला करणे, कट रचून मारहाण करणे, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे यासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राहुलच्या गुन्हेगारी कारवाया वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तडीपारचा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तडीपारची कारवाई होण्यापूर्वी राहुलचा वाढदिवस होता. राहुल चाबुकस्वारचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या साथीदारांनी जयभवानी नगरात रात्री केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो केक कापण्यासाठी राहुल ने भररस्त्यास तलवार काढून केक कापला त्यावेळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपयाने हजेरी लावली होती. चाबुकस्वार सोबत पोलीस शिपाई नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची दखल घेऊन पोलीस शिपयावर कारवाई केली.
إرسال تعليق