देशातील लोकसभा निवडणूकांना एक वर्ष तर विधानसभेच्या निवडणूकांना दिड वर्षे अद्याप राहीलेली असतानाच सर्वच राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आणि नेत्यांची पळवा पळवी सुरु केली आहे. या पळवा पळवीत आता शिवसेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश नाईक आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भाजप सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेकडून पाठिंबा दिला. मात्र पाठिंबा दिल्यानंतरही भाजपकडून शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक देण्याची संधी सोडली जात नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने स्वबळावर निवडणूका लढविण्याची भूमिका जाहीर केली. तसेच राज्यात काहीही करूनन शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवायचा या उद्देशाने मुळचे शिवसैनिक असलेल्या पण इतर पक्षात स्थिरावलेल्या सर्व नेते, आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच आग्री समाजाचे नेते तथा नवी मुंबईतील हेवीवेट नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा कोकणात शिवसेनेला पुन्हा बस्तान बसविण्यास मदत होवू शकेल असे भास्कर जाधव यांनाही शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे. याशिवाय शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत राजकारणातून छगन भुजबळ, गणेश नाईक आणि भास्कर जाधव हे बाजूला फेकले गेलेले आहेत. तसेच यापूर्वीच या तिन्ही नेत्यांनी शिवसेनेत परतण्यासंदर्भात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगत या तिन्ही नेत्यांमुळे शिवसेनेपासून दुरावलेली आग्री, ओबीसी समाजातील मते पुन्हा एकदा वळविण्यास मदत होणार आहे. तसेच पक्षवाढीबरोबरच भाजपला सशक्त टक्कर देता येणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने या तिन्ही नेत्यांशी चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत. बहुतांष करून या नेत्यांचा लोकसभा निवडणूकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
إرسال تعليق