विधान परिषदेतील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विजयी झाले आहेत. भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरे यांना भरघोस मताधिक्याने विजय मिळवता आला असून त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला.
रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील तीन जिल्ह्यांमध्ये मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ९४० मतदार होते. रायगड जिल्ह्यातील ४६९ मतदारांपकी ४६७ सदस्यांनी तर रत्नागिरी (२५९) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (२१२) सर्व सदस्यांनी मतदान केले होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत ९४० पैकी १२ मते बाद ठरली. तर दोन जण मतदानादरम्यान अनुपस्थित होते. उर्वरित मतांपैकी ६२० मते अनिकेत तटकरे यांना मिळाली असून राजीव साबळे यांना फक्त ३०६ मतांवर समाधान मानावे लागले. तटकरे हे ३१४ मतांनी विजयी झाले असून भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच त्यांना हा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षानेही तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्याने अनिकेत तटकरे यांचे पारडे जड होते.
रायगडमध्ये राजकीय हिशेब चुकते करण्याचीही संधी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधली. राणेंच्या ‘स्वाभिमान’ने तटकरेंना पाठिंबा जाहीर केला. तर दुसरीकडे पालघरमधील वचपा काढण्यासाठी भाजपानेही राष्ट्रवादीशी छुपी करत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
إرسال تعليق