बेळगाव: राजकारणात कधी कोणते चमत्कार पाहायला मिळतील, याचा नेम नसतो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे जनतेला असेच शाब्दिक चमत्कार अनुभवायला मिळत आहेत. मात्र, मंगळवारी बेळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेतील एक चमत्कार पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया आपोआपच उंचावल्या. या सगळ्याला निमित्त ठरले ते एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी. एरवी ओवेसी हे त्यांच्या कडवट विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांच्या एकूणच राहणीमानावरही याचा प्रभाव आहे.
त्यामुळेच एरवी शेरवानी आणि डोक्यावर गोल टोपी अशा वेषात दिसणाऱ्या ओवेसींना भगव्या रंगाचा फेटा घातलेला पाहून अनेकांना धक्का बसला.
यंदाच्या निवडणुकीत ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने एकही उमेदवार उभा केलेला नाही. निधर्मी मतांमध्ये फूट पडू नये, म्हणून ओवेसींनी हा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळेच ओवेसी सध्या जनता दलाचा (सेक्युलर) प्रचार करत फिरत आहेत. जनता दलाने कर्नाटकमधील मुस्लिमबहुल भागांमध्ये ओवेसी कार्ड वापरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे या भागांमध्ये ओवेसी आपल्या नेहमीच्या तिखट शैलीत भाजपा व काँग्रेसवर आगपाखड करत फिरत आहेत. बेळगावमधील सभेतही याचा पूरेपूर प्रत्यय आला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व राहुल गांधी या दोघांनाही एक आव्हान दिले. राहुल गांधी म्हणतात की, मला संसदेत 15 मिनिटेदेखील बोलू दिले जात नाही. तर मोदी त्यांना हातात कागद न धरता सलग 15 मिनिटं बोलून दाखवा, असे आव्हान देतात. परंतु, मला काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये गेल्या तीन वर्षांपासून बोलू दिले जात नाही त्याचे काय, असा सवाल त्यांनी विचारला. एवढेच नव्हे तर मोदी व राहुल गांधी दोघांनीही मला केवळ पाच मिनिटे बोलून द्यावे. मग बघा काय होते, असे ओवेसी यांनी म्हटले.
إرسال تعليق