वेतन करारात दुप्पटीने वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारात दुप्पट वाढ, रावतेंची घोषणा
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचं सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचं रावते म्हणाले.
मुंबई : एसटी महामंडळाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला. शिवाय वेतन करारात दुपटीने वाढ करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
वेतन करारात दुप्पटीने वाढ
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचं सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचं रावते म्हणाले.
शिवशाहीचं सरकार असताना 1996 ला 72 कोटींचा करार केला. सगळ्याच सरकारच्या कार्यकाळात दोन वर्षांपर्यंत करार रखडले. तरीही याच सरकारवर टीका करण्यात आली. पाप कुणाचं अन् ताप कुणाला अशी माझी अवस्था झाली असल्याचंही रावते म्हणाले.
2012 ते 2016 या काळात 1240 कोटींचा करार होता. 2016 ते 2020 सालापर्यंत 4849 कोटींचा करार करण्याचा निर्णय घेत असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली आहे. या वेतनवाढ कराराचा 47 हजार ते 50 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल. यासाठी 176 कोटी रुपयांचा भार महामंडळ स्वीकारत आहे, अशी माहिती रावतेंनी दिली.
कर्मचाऱ्यांसाठी घोषणा
एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सवलतीचा पास दोन महिन्यांऐवजी सहा महिने वाढवण्याचा निर्णय
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतीबा फुले शिष्यवृत्ती योजनेद्वारे 750 रुपये प्रति महिना देणार, यासाठी 22 ते 23 कोटी खर्च करणार
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अग्रीम बिनव्याजी कर्ज योजना जाहीर
पाल्यांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी लागणारे खर्च एसटी महामंडळ देणार
शहीद पत्नींना मोफत पास आणि वारसांना नोकरी योजनेची आजपासून अंमलबजावणी
इंद्रजीत सुधाकर भट यांची एसटीत इंजिनीयर म्हणून नियुक्ती
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामधली विकृती नष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
हजेरी प्रोत्साहन - 180 रुपयांवरुन 1200 रुपये
धुलाई भत्ता - 50 रुपयांवरुन 100 रुपये
वुलन धुलाई भत्ता - 18 रुपयांवरुन 100 रुपये
रात्री तीन तास काम केल्यास तीन रुपये भत्ता मिळायचा, तो आता 35 रुपये मिळणार
रात्रपाळी भत्ता चार रुपये होता, तो आता 75 रुपये मिळणार
जिल्ह्याच्या ठिकाणी 15 रुपये भत्ता होता, तो 100 रुपये मिळणार
7 जूनपर्यंत नवा करार मान्य करावा लागणार
कर्मचाऱ्यांना 7 जूनपर्यंत नवा करार मान्य करावा लागेल. मान्य नसेल त्यांनी राजीनामा द्यावा, असंही रावते म्हणाले. पाच वर्षांकरिता करारावर 20 हजार प्रति महिना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
घोषित केलेला करार मान्य असेल तर पाच वर्षातील कर्मचाऱ्यांना,
कनिष्ठ श्रेणीसाठी ( 5 वर्षे ) 4000 ते 9000 अशी वाढ होणार
कनिष्ठ श्रेणीसाठी ( 3 वर्षे ) एक हजार ते 5 हजार अशी वाढ असणार
जे कर्मचारी नुकतेच आले आहेत, त्यांना 2000 रुपये वाढ
ज्येष्ठ कर्मचारी यांना 12 हजार रुपये वेतनवाढ
एकूण वेतनातील 4275 ते 9105 वाढ
यामुळे 4500 कोटी तोटा होणार आहे.
एसटी महामंडळ तरुणांना नोकऱ्याही देणार
महाराष्ट्रात दुर्दैवाने नोकऱ्या नाहीत. ज्या नोकऱ्या आहेत त्याही करारावर आहेत. सराकारलाही नोकरीवर ठेवणं परवडत नाही. मात्र एसटी महामंडळ तरूणांना नोकरी देणार असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
मुख्यमंत्री जागे झाले तर ते आम्हाला मदत करतील. त्यांच्याकडे भरपूर कामे असतात. त्यांना वाल्या शोधायचा असतो. त्यामुळे त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही, असा टोलाही रावतेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
तिकीट दरवाढीचा निर्णय 15 जूननंतर
डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे एसटीचा तोटा वाढला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसून 15 जूननंतर निर्णय घेऊ, अशी माहिती रावतेंनी दिली.
दरम्यान, वेतनवाढ आणि एसटीचा तोटा होत असला तरी कर्मचारी भरती थांबवणार नाही, आवश्यक जागा भरणारच, असंही रावतेंनी स्पष्ट केलं.
एसटीला टोलमाफी देण्याची मागणी
एसटीला राज्यात टोलमाफी द्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली आहे. टोलमाफी झाली तर वर्षाला एसटीचे 150 कोटी वाचतील, अशी माहिती रावतेंनी दिली.
إرسال تعليق