पुढच्यावर्षी होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. शिवसेनेने दुकानांवरच्या पाटया मराठीत करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे. जे दुकानदार दिलेल्या मुदतीत दुकानांच्या पाटया मराठीत करणार नाहीत त्या पाटयांना काळे फासा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
मराठी पाटयांचा मूळ मुद्दा हा शिवसेनेचा आहे. पण मध्यंतरी मनसेने हा मुद्दा हायजॅक करुन शिवसेनेची कोंडी केली होती. २००८ च्या दरम्यान राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला. त्यावेळी रेल्वेभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासाह मराठी पाटयांचा विषय मनसेने लावून धरला होता. मनसेच्या आक्रमक इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक दुकानांवर मराठी पाटया दिसू लागल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला आपल्या मूळ भूमिकेचा विसर पडल्याची जोरदार टीका करण्यात आली होती.
पण पुढे मनसेचे तेरा आमदार निवडून आले आणि हळूहळू मनसेलाही मराठी पाटयांच्या मुद्याचा विसर पडला. आता या विषयावरुन शिवसेनेने आंदोलनाची हाक देऊन पुन्हा एकदा हा मुद्दा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर या निर्णयामागे एकगठ्ठा मराठीमते मिळवण्याची शिवसेनेची रणनिती आहे. आगामी काळात शिवसेना स्वबळावर निवडणुकींना सामोरी गेली तर त्यांच्यासमोर भाजपाचेच मुख्य आव्हान असणार आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदार मोठया प्रमाणावर भाजपाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही महत्वाच्या निवडणुका शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. आगामी काळात मराठी मतदाराने भाजपाकडे जाऊ नये हे सुद्धा मराठी पाटयांच्या आंदोलनामागचे राजकीय गणित असू शकते. दुसऱ्या बाजूला मनसेची राजकीय ताकत सध्या कमी झाली असली तरी मराठीचा मुद्दा मनसेसाठीही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे मनसेही हा विषय सोडणार नाही. पुढच्या काही दिवसात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
إرسال تعليق