कसोटी संघाचा दर्जा मिळवणारा अफगाणिस्तानचा संघ आज ऐतिहासिक कसोटीत भारतासमोर भुईसपाट झाला. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपली चमक दाखवली. आपला पहिलावहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानवर एकाच दिवशी दोन वेळा माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना रंगला होता. दुसऱ्याच दिवशी भारताने १ डाव आणि २६२ धावांनी जिंकला.
भारताने जरी हा सामना दणदणीत फरकाने जिंकला असला, तरीही भारताने आपला नम्रपणा आणि खिलाडूवृत्ती दाखवली. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामना आणि मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी स्वीकारली. या वेळी दोनही संघाचे कर्णधार यांनी आपापपली मते व्यक्त केली. त्यानंतर परंपरेनुसार त्या ट्रॉफी बरोबर विजेत्या संघाने म्हणजेच भारताने फोटो काढला. मात्र, अजिंक्य रहाणे फक्त या फोटोवर थांबला नाही. तर त्याने अफगाणिस्तानच्या संघालाही बोलावले आणि एकत्रितपाने त्या ट्रॉफीसोबत फोटो काढला.
हा फोटो आयसीसीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. याशिवाय, सोशल मीडियावरही हा फोटो तुफान व्हायरल झाला. अजिंक्य रहाणे हा शांत आणि संयमी क्रिकेटपटू म्हणून कायम ओळखला जातो. त्याचबरोबर त्याच्या खिलाडूवृत्तीचेही दर्शन आज घडले, असा सूर सोशल मीडियामध्ये उमटलेला दिसला.
إرسال تعليق