मुंबई : दिग्दर्शक अभिजीत पानसेने आपल्या पहिल्याच सिनेमातून समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्याने बनवलेला 'रेगे' कौतुकास्पद होता. आता त्याने आपल्या अंगावर शिवधनुष्य घेतलं आहे. कारण संजय राऊत यांची निर्मिती असलेला 'ठाकरे' या चित्रपटाचं दिग्दर्शन तो करतो आहे.
या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव जाहीर झालं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण चित्रपटाचा टीजर आला आणि आपण खरंच बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो की काय असं वाटून गेलं.
सध्या या चित्रपटाचं चित्रिकरण चालू आहे. याचवेळी नवाजुद्दीन सिद्दीकी वठवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची छबी समोर आली आणि क्षणभर उभ्या महाराष्ट्राचा श्वास रोखला गेला.
या सिनेमामध्ये रंगभूषेला खूप महत्व दिल्याची चर्चा आहे. नवाजुद्दीनचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याची कल्पना येते. या फोटोत साहेबांचा अॅटिट्यूड, त्यांची पाहण्याची पद्धत, सोबत खांद्यावर टाकलेली भगवी शाल आणि समोर ठेवलेला गरुड... यातून कट्टर साहेब समर्थकांना सगळं काही समजतं. या फोटोमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढलीय हे निश्चित.
या चित्रपटात शिवसेनेची मुहूर्तमेढ दाखवली जाणार आहे. यात नवाजुद्दीन यांच्यासोबत प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, संदीप खरे यांच्याही भूमिका आहेत.
إرسال تعليق