गेटपास दिल्यावरही तीन गावातील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र का दिले जात नाहीत ? असा सवाल केल्यामुळे वीज महावितरण प्रशासनाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह नगरसेवक प्रतिनिधी राम कदम यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. हिंगोली शहर पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता जिल्हाप्रमुख संतोष बांगर आणि शिवसैनिक राम कदम यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्राचा प्रश्न कायम वादग्रस्त राहिला आहे. वीज महावितरण कंपनीच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र बदलून दिले जात नाहीत. पावसाने पाट फिरवल्याने शेतकरी कृषीपंपाद्वारे शेतीला पाणी देऊन पेरणीचा प्रयत्नात आहेत. तसेच पहिल्या पावसानंतर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पीके उगवत असूनही उगवलेली पीके वाळून जाऊ नयेत, यासाठी कृषीपंपाद्वारे पाणी देण्याची धडपड बळीराजाकडून सुरू आहे. मात्र, विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्यावर देखील बदलून दिले जात नाहीत.यामुळे ऐन खरीप हंगामातच शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. जिल्हृयातील बेलुरा, वसई आणि हारवाडी या तीन गावातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे वीज महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी विद्युत रोहित्र बदलुन देण्याची मागणी केली. तब्बल पंधरा दिवस उलटुन देखील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र देण्यात आले नाही.
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी याप्रकरणी लक्ष देऊन महावितरण अधिकाऱ्यांना विद्युत रोहित्र द्यावे, अशी सुचना केली. त्यानंतर या तीनही गावातील शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रासाठी गेटपास देण्यात आला. मात्र, गेटपास देऊनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ही अडचणी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना सांगितली. गेटपास दिलेली असल्यामुळे विद्युत रोहित्र देण्यात यावे आणि शेतकऱ्यांची अडचण दुर करावी, अशी विनंती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू घेतल्यामुळे चिरमिरी उकळण्यात अडथळा येत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरत त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या तक्रारीवरुन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्ररकणी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर व नगरसेवक प्रतिनिधी तथा शिवसैनिक राम कदम या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे कार्यालय तसेच रोहित्र देण्याच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास शेतकरी व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राम कदम हे महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत सौजन्याने बोलत असल्याचे दिसून येईल. मात्र, पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केला आहे. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सैदव तत्पर राहणार आहोत. पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन असे खोटे गुन्हे दाखल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही प्रशासनास समन्वय ठेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी व जनतेला न्याय देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हाप्रमुख संतोष बांगर व राम कदम यांच्याविरुध्द महावितरण आणि पोलीसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे शिवसैनिकांसह शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
إرسال تعليق