औरंगाबाद : दीड महिन्यापुर्वी शहरात उसळलेली जातीय दंगल शांत झाली आहे. लोक नव्याने आपापल्या उद्योग, धंद्याला लागले असतांना इम्तियाज जलील हजारोंचा जमाव पोलिस ठाण्यावर नेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दीड तास सहा हजारांच्या जमावाने पोलिसांवर बांगड्या, पैसे फेकत सरकारी कामात अडथळा आणला. आमदार इम्तियाज जलील शहरात पुन्हा दंगल घडवू पाहत असतील तर त्यांची ही हैदराबादी नवाबगिरी आम्ही औरंगबादमध्ये चालू देणार नाही असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला.
दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा दंगेखोरांना जामीनावर सोडा या मागणीसाठी 26 जून मंगळवार रोजी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांचा मोठा जमाव सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जमला होता. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला. या विरोधात तीन दिवसांपुर्वी चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हे दाखल करणार का ? असा सवाल केला होता. त्यानंतर आज (ता. 30) सकाळी चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन इम्तियाज जलील व एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर जमावबंदी मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
इम्तियाज जलील यांनी लोकांना भडकवून सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन केल्याची व्हिडिओ क्लीप असल्याचा दावा ध्यमांशी बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी केला. सहा हजारावर लोक जमा होऊन पोलीसांवर बांगड्या, पैसे फेकत होते, त्यांना शिवीगाळ करत होते. असेही ते म्हणाले . दंगलीनंतर शिवसेनेने शहरातील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण इम्तियाज जलील पुन्हा शहरात दंगल घडवू पाहत असतील तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत. पोलीसांनी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जमा झालेल्या सहा हजारांच्या जमावावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिवसेना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.
मे महिन्यात झालेल्या दंगलीनंतर शहराची परिस्थिती पूर्वपदावर आली होती. परंतु 26 जून रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमल्यानंतर वातावरण पुन्हा बिघडले. यावरून शिवसेना आणि एमआयएम आमने-सामने आले असून चंद्रकांत खैरे व इम्तियाज जलील यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.
إرسال تعليق