श्रीलंका:-काही दिवसांपूर्वी उत्तर श्रीलंकेतल्या जाफना जिल्ह्यात सावकचेरीमध्ये एका कार्यक्रमात गोहत्येच्या निषेधार्थ निदर्शनं झाली होती.

या कार्यक्रमात गोमांस बंदीची मागणी केल्यानंतर सच्चिदानंदम प्रकाशझोतात आले.

"सौदी अरेबियामध्ये अर्ध्याहून अधिक लोक मुस्लीम नाहीत, पण ते इस्लामला मान्य नसलेलं पोर्क खातात का? मग श्रीलंका हे तर एक बुद्धिस्ट-हिंदू राष्ट्र आहे, इतर धर्मातील समाजाचं हे राष्ट्र नाही. बौद्ध हिंदू परंपरा ज्यांना मान्य नाही त्यांनी देश सोडावा. त्यांच्या परंपरा जिथे आहेत तिथे त्यांनी जावं," असा इशारावजा सल्लाही यावेळी सच्चिदानंदम दिला.

'तुमचा धर्म आमच्यावर लादू नका'

त्यांचा इशारा या भागातील ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायांकडे होता. भारतात गोवंशहत्येला विरोध आहे. त्यावर बंदीची मागणी आणि स्वयंघोषित गोरक्षकांकडून कायदा हातात घेण्यासारखे प्रकार याआधीही घडले आहेत.

पण श्रीलंकेत या मुद्द्यावर पहिल्यांदाच मागणी होत आहे.

राज्यघटनेनुसार धर्मनिरपेक्ष मानल्या गेलेल्या श्रीलंकेत साधारण 70.2 टक्के बौद्ध, 12.6 टक्के हिंदू, 9.7 टक्के मुसलमान तर 7.45 टक्के ख्रिश्चन राहतात. इथले तीन चतुर्थांश नागरिक सिंहली आहेत, तर तामिळ हिंदू, मुस्लीम आणि बर्घर (म्हणजे डच आणि पोर्तुगीज वसाहतवाद्यांचे वंशज) उर्वरीत अल्पसंख्याक गटात मोडतात.

पण श्रीलंकेच्या नॉर्थर्न प्रोव्हिन्समध्ये हिंदूंची लोकसंख्या बौद्ध आणि ख्रिश्चनांपेक्षा जास्त आहे. अशा भागांमध्ये ख्रिश्चन मिशनरींची संख्या वाढत आहे आणि या मिशनरी हिंदूंचं धर्मांतर करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत, असा आरोप सच्चिदानंदम करतात. शिवसेनैचा लढा या मोहिमेविरुद्ध आहे, असं ते स्पष्ट करतात.

"आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे - आम्ही जसे आहोत, आम्हाला तसं जगू द्या. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदूच राहू द्या. आमच्यावर तुमचा धर्म लादण्याचा प्रयत्न करू नका."

शिवसेनैचं शिवसेना कनेक्शन

शिवसेनैची स्थापना करण्याची गरज का पडली, हे विचारल्यावर सच्चिदानंदम गेल्या तीन दशकांची पार्श्वभूमी सांगतात. "श्रीलंकेत ठिकठिकाणी तामिळभाषिकांवर झालेल्या अत्याचारांची दखल 1983मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पण त्यानंतर श्रीलंकेत तीन दशकं गृहयुद्ध चाललं. या युद्धानंतरही बौद्धांच्या कल्याणाची काळजी सरकारने घेतली, मुस्लिमांना बरोबर आखाती देशांमधून पैसा मिळतच असतो आणि ख्रिश्चनांना पाश्चात्त्य देशांमधून पुरवठा होतच असतो. पण हिंदूंच्या रक्षणासाठी इथे कुणीच नव्हतं."

"तेव्हा आम्ही परिसरातल्या हिंदूंसाठी एकजूट झालो. मला कळलं की बाळासाहेबांनीही मुंबईत अशाच प्रकारे त्यांची संघटना उभी केली होती. श्रीलंकेतले 99 टक्के हिंदू शैव आहेत, म्हणून मग आम्हीही 10 ऑक्टोबर 2016 ला शिवसेनैची स्थापना केली," ते सांगतात.

77 वर्षांच्या सच्चिदानंदम यांचा गोव्यातल्या वादग्रस्त सनातन संस्थेशी संबंध आहे. त्यांनी 'अध्यात्माची 64 टक्के पातळी' गाठली आहे, असं 'प्रमाणपत्र' सनातन संस्थेनं दिलं आहे

पण 1960 आणि 1970च्या दशकात बाळासाहेबांचा लढा हा मुंबईतल्या दक्षिण भारतीयांविरुद्धच होता, तामिळ भाषिकांविरुद्धच होता, हा विरोधाभास लक्षात आणून दिल्यावर सच्चिदानंदम सांगतात, "त्यांनी मुंबईत जे केलं तो त्यांचा तिथला प्रश्न होता. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदूंच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रेरित झालो. हे सगळे गट, मग ते भारतीय जनता पक्ष असो वा विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल या सर्वांची विचारधारा एकच आहे - हिंदूंचं संरक्षण. आम्ही तसेच आहोत."

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही याच विचारधारेमुळे आपला शिवसेनैला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. न्यूज 18च्या वृत्तानुसार ते म्हणाले होते, "आमचा पक्ष हा एक हिंदू पक्ष आहे. म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंसाठी लढणाऱ्या संघटनांना आमचा पाठिंबा आहे."

सच्चिदानंदम सांगतात, "शिवसेना आजही आम्हाला खूप मदत करते. मी स्वतः बाळासाहेबांना अनेक वेळा भेटलो, संजय राऊतांची भेट घेत असतो. त्यांनी आम्हाला मुंबईत सभा घेण्यास खूप मदत केली."

गोमांसबंदीचा प्रश्न कसा आला?

लोकांना बीफसारख्या खाद्यपदार्थांद्वारे आकर्षित करून त्यांच्यावर पाश्चात्त्य संस्कृती बिंबवण्याचा प्रकार ख्रिश्चन संघटनांनी चालवला आहे. त्यातून मुस्लिमांचा धंदाही चालतो, म्हणून तेही याला प्रोत्साहन देतात, असा दावा शिवसेनैचे संस्थापक सच्चिदानंदम करतात.

अधिक माहिती साठी तुम्ही BBC International च्या मराठी संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

https://www.bbc.com/marathi/international-44341931

Post a Comment

Previous Post Next Post