मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राचा कोपरान् कोपरा पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईहून केवळ एक दिवसासाठी एखाद्या ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याची सवय इतिहासजमा करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन लोकसभा मतदारसंघांचा एकत्रित दौरा करणार आहेत.
फेब्रुवारी ते एप्रिल या काळात चालणाऱ्या या संपर्क मोहिमेअंतर्गत पहिला पाडाव संभाजीनगरचा असून, उद्धव ठाकरे तेथे 4 फेब्रुवारी रोजी डेरेदाखल होतील. बीड आणि लातूर परिसराचीही वास्तपुस्त याचकाळात करण्यात येईल. त्यानंतर लगेचच ते यवतमाळ या शिवसेनेसाठी विदर्भात अत्यंत महत्त्वाचा टापू असलेल्या ठिकाणी जाणार आहेत. पूर्वनिश्चित ठिकाणी दोन ते अडीच दिवसांचा मुक्काम करून त्या परिसराचे प्रश्न तसेच तेथील पक्षबांधणीकडे उद्धव ठाकरे जातीने लक्ष देतील. केरळात छायाचित्रणासाठी गेलेले उद्धव मुंबईत परतणार असून ते मिशन महाराष्ट्राच्या दौऱ्याला लगेचच प्रारंभ करतील. शेतीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद, शेतमजुरांच्या भेटी आणि पक्षातील संघटनात्मक राजीनाराजीचा आढावा असे या दौऱ्याचे स्वरूप असेल.
महाराष्ट्रातील जातीय वातावरण कमालीचे गढूळ झाले असून, त्यात एकजीनसीपणा यावा यावर उद्धव ठाकरे भर देणार असल्याचे पक्षप्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीय राजकारणापासून महाराष्ट्राला दूर ठेवले तोच वारसा चालवत जातीयता हद्दपार करू, या विषयावर उद्धव ठाकरे भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Post a Comment