पालघर
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नालासोपाऱ्यात तर योगी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये प्रचार सभा घेऊन एकमेकांविरोधात घणाघाती टीका करत प्रचाराचा धुरळाच उडवून दिला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. 'स्वत:च लोकसभा मतदारसंघ राखू शकला नाही, असा मुख्यमंत्री इथे येऊन मार्गदर्शन करतोय,' असा टोला उद्धव यांनी योगींना हाणला. मोदींनी कधी तरी आमच्या देशात यावं, असं उपरोधिक आवाहनही त्यांनी यावेळी केलं. 'जे लोक माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विसरले, ते वनगांना काय न्याय देणार?,' अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

तर योगी आदित्यनाथ यांनी नालासोपारा येथील सभेत मराठीतून भाषणाला सुरुवात करत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्तुती केली. राज्य कसं चालवावं हे फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. मोदी जगात जिथं जातात, तिथं त्यांचं प्रचंड स्वागत केलं जातं, असंही ते म्हणाले.

यावेळी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'काही लोक नाव शिवसेनेचं घेतात आणि काम अफझलखानाचं करतात,' अशी टीका आदित्यनाथ यांनी केली. 'वनगा प्रकरणात शिवसेनेने नाक खुपसण्याची काहीच गरज नव्हती. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न होता,' असं सांगतानाच 'आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच विसरू शकत नाही. त्यांनी कधीच पाठित खंजीर खुपसला नव्हता,' असा टोलाही त्यांनी उद्धव यांना हाणला.

Post a Comment

Previous Post Next Post