माझ्यासाठी जय-पराजय महत्वाचा नाही. बाबांचे (चिंतामणी वनगा) कार्य सुरूच ठेवेन. मी आजपासूनच २०१९ च्या लोकसभेची तयारी सुरू केली आहे. पण उद्धव ठाकरेंनी जर दुसरा उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देईन, अशी प्रतिक्रिया पालघर मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दिली. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडून वनगा यांचा २९,५७२ मतांनी पराभव झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, शिवसेनेने पहिल्यांदाच निवडणूक लढवली. मतदारसंघात पक्ष सर्व लोकांपर्यंत पोहोचला नसतानाही आम्ही भाजपाला चांगली लढत दिली. कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले होते. मी त्यांचा आभारी आहे. या निवडणुकीत चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले.
प्रचारावेळी भाजपाने साम-दाम-दंड-भेदचा वापर केल्याचा आरोप ही त्यांनी केला. मतदारांना पैसे वाटण्यात आले. जनता दहशतीखाली होती असे सांगत इव्हीएमबाबतही शंका व्यक्त केली. अनेक ठिकाणी इव्हीएम बंद पडले होते. लोक रांगेत अनेक काळ तिष्ठत उभे होते. अनेकजण कंटाळून कामावर निघून गेले. तसेच मतदान अधिकाऱ्यांनीही निवडणुकीची टक्केवारी वेगवेगळी सांगितली. एकाच रात्री सात ते आठ टक्क्यांनी मतदान कसे वाढले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदारसंघात बाबा म्हणजे कमळ हे चिन्ह सर्वांना माहीत होतं. शिवसेनेचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. त्यांना हे नवीनच होते. तसेच भाजपाकडून बाबांच्या फोटोचा वापर करण्यात आला. त्यामुळे लोकांनी भाजपाला मतदान केले असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. भाजपाच्या नेते मंडळींनी माझ्यावर अन्याय केला. जनतेलाही हे माहीत असल्याचे त्यांनी म्हटले.

Post a Comment

Previous Post Next Post