सदरील बातमी सरकारनामा या वृत्तवाहिनीतुन प्रकाशित केली गेली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदार संघासाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या निरंजन डावखरे यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले असून पहिल्यांदाच शिवसेना या निवडणुकीत सहभागी होणार आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेले निरंजन डावखरे यांना त्यावेळी २७,७३३ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात लढलेले भाजपचे संजय केळकर यांना २२,०९२ मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेने डावखरे यांना छुपा पाठींबा दिल्याने ते निवडून आले होते. डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी या मतदारसंघात भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच कोकणातील सर्व आमदार, पदाधिकारी, शाखाप्रमुख यांना सुचना देऊन पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याच्या सुचना केल्या होत्या. मतदार नोंदणी अद्यापही सुरू असून शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिका-यांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर, नोंदणी प्रक्रियेवर त्यांनी वैयक्तिक लक्ष ठेवले आहे. नोंदणीचा नियमित आढावा घेण्यासाठी त्यांनी काही पदाधिका-यांकडे जबाबदारीही सोपविल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आतापर्यंत ८६,५८९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी एकट्या शिवसेनेनेच ४५ हजार पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे एकगट्टा मते शिवसेना उमेदवाराला मिळवून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा पराभव करण्याची रणनिती शिवसेनेने आखली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या मतदार संघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत शिवसेनेने अद्याप गुप्तता पाळली आहे. आयत्या वेळी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post