संभाजीनगर:- भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर नगर आणि आता संभाजीनगरमध्ये दंगल उसळली. राज्यात खून, बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत.या परिस्थितीमध्ये गृहमंत्रालयाने दंगेखोर-समाजकंटकांन विरोधात कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. परंतु अशी पावले उचलण्यास गृहमंत्रालय अस्तित्वात आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
संभाजीनगरमध्ये उसळलेल्या दंगलीची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार सतीश चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख, कदीर मौलाना, कमाल फारुकी आदींची उपस्थिती होती.
संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणाच्या भांडणाचे रूपांतर दंगलीत होण्याची शक्यता इंटेलिजन्स ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी दोन – अडीच महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. त्यासंबंधीचा अहवालही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. तो अहवाल दडवला गेल्यामुळे शहरात दंगल घडली. दंगल घडण्यास जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. शहरात दंगल घडणे हे पोलिसांचे अपयश आहे. गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. संभाजीनगर हे महत्त्वाचे आणि मराठवाडा विभागाच्या राजधानीचे शहर. या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नसणे, ही दुर्दैवी बाब आहे. राज्य शासनाला महापालिकेसाठी सक्षम आयुक्त देता आलेला नाही.
संभाजीनगरच्या दंगलीत दोघांचे बळी गेले असून जाळपोळीमुळे व्यापाऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या दंगलीत बळी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी २ लाखांची मदत शासनाने करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, संभाजीनगर येथील दंगलीमध्ये जीव गमावलेल्या जगननलाल बन्सिले (७२) यांच्या कुटुंबीयांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजीत देशमुख यांनी स्वत: ५० हजार रूपयांची मदत केली.
दंगेखोरांच्या तावडीतून आम्हाला वाचविण्यासाठी शिवसेना धावून आली. दोन दिवस उलटले तुम्ही कुठे होता, असा संतप्त सवाल राजाबाजारमधील रहिवाशांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला. काल काँग्रेसचे माणिक ठाकरे आले असता त्यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना रहिवाशांनी भंडावून सोडले होते. आजही मुंडे यांना तो अनुभव आला. माझे म्हणणे ऐकून घ्या, असे सांगत मुंडे यांनी ज्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना मदत मिळवून देऊ, असे सांगत वेळ मारून नेली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सतीश चव्हाण, कदीर मौलाना, अभिजित देशमुख आदी राष्ट्रवादींची नेतेमंडळी होती.
Post a Comment