कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा घुमला आहे. महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची निवड झाली. मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. विनिता राणे यांची बिनविरोध निवड होताच शिवसेना झिंदाबादचा आवाज सभागृहात घुमला. महापालिका मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला.
महापौर राजेंद्र देवळेकर यांचा अडीच वर्षांचा पहिला कार्यकाळ ११ मे रोजी संपत असल्याने दुसऱ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी ही निवड झाली. पालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. सर्वाधीक नगरसेवक शिवसेनेचे असल्याने महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपला मिळाले. महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. या पदासाठी शिवसेनेने डोंबिवली प्रभाग ६४ येथील विनिता राणे यांना संधी दिली. निवडणूक कार्यक्रम सुरू होताच भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी आपला महापौरपदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे विनिता राणे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमहापौरपदासाठी कासिफ तानकी यांनी अर्ज मागे घेतल्याने उपेक्षा भोईर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवडणूक झाली.
Post a Comment