नाशिक : माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवल्यात पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना नेते संभाजी पवार यांना सलग दुसऱ्यांदा सभापतीपद शिवसेनेकडे आले आहे. ते शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडीला राजकीयदृष्ट्या महत्व आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत श्री. भुजबळ यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेने या मतदारसंघात सर्व शक्ती पणाला लावूनव नेमके डावपेच वापरून भुजबळांच्या गटावर मात करीत दहा पैकी सात जागा जिंकल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह मिळाला होता. सौ. जगताप यांचे सासरे तथा ज्येष्ठ नेते रायभान जगताप यांनी निवडणुकीत तालुक्यात राजकीय व्युहरचना केली होती. आपल्या सुनेला सभापतीपद मिळावे ही त्यांची इच्छा होती. मात्र त्यांचे निधन झाले. त्यामुळे या निमित्ताने (कै) जगतापांच्या इच्छेला मूर्त स्वरुप मिळाले.
पंचायत समिती सभापतिपदी जगताप यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तनानुसार मावळत्या सभापती आशा साळवे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ही निवडणूक झाली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी आमदार मारोतराव पवार, ऍड. माणिकराव शिंदे, पणन महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई शिंदे, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. शिवसेनेचा सभापती सलग दुसऱ्यांदा संभाजी पवारांमुळे झाला, याचे श्रेय देताना ऍड. माणिकराव शिंदे यांनी पवारांनी तालुक्यात चांगले काम उभे केल्याचे सांगितले. गेल्याच आठवड्यात श्री. भुजबळ यांनी मतदारसंघाचा दौरा केला होता. त्यात पुढील राजकीय लढाईसाठी सक्रीय होण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर ही निवड चर्चेचा विषय ठरली आहे.
Post a Comment