मुंबई :- आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आपला मित्रपक्षच राहील, अशी ग्वाही भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल 'मातोश्री' भेटीत दिली असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, शिवसेना स्वबळावर निवडणुका लढण्यावर ठाम आहे. अमित शहा यांचा अजेंडा आम्ही जाणून आहोत. त्यामुळे पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव पक्षानं केला आहे. काहीही झालं तरी त्यात बदल होणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

'संपर्क फॉर समर्थन' अभियानांतर्गत मुंबई दौऱ्यात अमित शहा यांनी काल मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यातील युती भक्कम करून विरोधकांशी दोन हात करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे कळते. तसंच आगामी निवडणुका युती करून लढणार असल्याचं भाजपच्या गोटातून सांगण्यात येत असलं तरी, शिवसेनेनं पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. शहा यांच्या अजेंड्याविषयी आम्हाला माहिती आहे. पण आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव केला आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी ठाम भूमिका राऊत यांनी मांडली. एका पक्षाचा ठराव दुसरा कोणताही पक्ष ठरवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post