मुंबई : मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपाकडून अॅड. अमित मेहता यांना उमेदवारी दिल्याने, मुंबईतील पदवीधर मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एका लॉ फर्ममध्ये मॅनेजिंग पार्टनर असलेल्या मेहता यांनी रेरा प्राधिकरणाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्ये त्यांनी काम केले आहे. एकीकडे रेरा, तर दुसरीकडे गृहनिर्माण चळवळीत काम करत असल्याने, महेता यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याची माहिती आहे. तूर्तास मुंबई पदवीधर मतदार संघाची एक जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची कोंडी करण्याची सुवर्णसंधी भाजपाकडे असल्याने, मेहता यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजपा कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोरेगाव येथील रहिवाशी असलेले मेहता मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. विद्यार्थी चळवळीपासून भाजपात सक्रिय असून, मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण सेलचे ते प्रमुख आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्क, ग्राहक संरक्षण आणि भाडेकरू हक्कांसाठी न्यायालयीन लढा देत असल्याने, कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठिशी असल्याचे मेहता सांगतात.
शिवसेनेने यंदा या ठिकाणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याजागी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. पोतनीस यांना या वेळी शिक्षक भारतीच्या जालिंदर सरोदे यांच्यासह स्वाभिमान पक्ष पुरस्कृत राजू बंडगर यांचे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता
आहे. अशा परिस्थितीत भाजपाकडून सर्व ताकद पणाला लावली जात असल्याने, मेहता यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Post a Comment