मुंबई : राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यानिमित्ताने संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठी चर्चा चालू आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाने संजय दत्तच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. याच प्रकरणात संजयला जामीन मिळावा, यासाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्न केले होते. ‘संजू’ चित्रपटामध्ये मात्र या घटनेचा संदर्भ देण्यात आलेला नाही.

‘बाबरी मशिद’ पाडली गेल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीवेळी संजय दत्तकडे शस्त्र सापडली होती. यामुळेच त्याला अटकही करण्यात आली.  या प्रकरणात संजय दत्त विनाकारण अडकला जात आहे, असं बाळसाहेबांचं मत होतं.

टाडा कोर्टाकडून संजय दत्तला जामीन मिळावा, यासाठी 1995 साली बाळासाहेबांनी मोठे प्रयत्न केले. यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती.

बाळासाहेब ठाकरेंनी जामीन मिळवून देण्यासाठी  केलेल्या या प्रयत्नांमुळेच बाळासाहेबांच्या निधनापर्यंत संजय दत्त त्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेत असे.

एका आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, अशी बाळासाहेबांवर नेहमीच टीका होत राहिली.

दरम्यान, वडील सुनील दत्त यांनी संजयची सुटका व्हावी यासाठी बाळासाहेंबांच्या आधी शरद पवारांसह इतरही मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती. पण या भेटींचा काहीच फायदा न झाल्याने त्यांनी युती सत्तेवर कंट्रोल असणाऱ्या बाळासाहेबांची भेट घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post