आठवीच्या पुस्तकात गुजराती भाषेतील धड्यावरुन झालेला वाद ताजा असतानाच महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावाचा उल्लेख 'गुजराष्ट्र ' म्हणून केला तर आर्श्चर्य वाटणार नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वाहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या वाहिनीची निवड केली आहे. या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषय महाराष्ट्रात ही दूरचित्रवाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत ‘डिश सेटटॉप’ बॉक्स बसवावा किंवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधील 'वंदे गुजरात' वाहिनी बघावी, असे आदेशात म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही नाही, अशा शिक्षकांना इतर शाळेत जाऊन प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयावरुन शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी टीका केली आहे.
'महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भविष्यात महाराष्ट्राचा उल्लेख "गुजराष्ट्र ' म्हणून केला तरी आश्चर्य वाटणार नाही. शिक्षण मंत्र्यांना असलेला गुजराती भाषेबद्दलचा पुळका आम्ही समजू शकतो. परंतु महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये याचा प्रत्यय वारंवार येत असून सहयाद्री या दूरचित्रवाहिनीचा हा अनादर आहे. आजही ग्रामीण भागामध्ये सह्याद्री ही दूरचित्रवाहिनी तितकीच लोकप्रिय असून शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांनी तात्काळ हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळा अजूनही अनेक समस्यांना तोंड देत असून अशा आडमुठ्या शैक्षणिक धोरणामुळे समस्त शिक्षकवर्गामध्ये नाराजी पसरल्याचे त्यांनी सांगितले.
إرسال تعليق