औरंगाबाद : औरंगाबाद शहरात 1987-88 च्या काळात जातीय दंगल उसळली आणि तेव्हाचे जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांना रासुका अंतर्गत अटक झाली. अकोला येथील कारागृहातून शिक्षा भोगल्यानंतर सुभाष पाटील आणि मी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुंखांची भेट घ्यायला गेलो. हा संजय सिरसाट, दलित समाजाचा कार्यकर्ता अशी सुभाष पाटलांनी माझी बाळासाहेबांशी ओळख करून दिली. तेव्हा ते ताडकन उठले आणि म्हणाले, "अरे मी संजयला ओळखत नाही का ? त्याची ओळख काय करून देतो. एक लक्षात ठेव शिवसेनेत कधीच जात-पात पाहिली जात नाही. तुम्हीही जात डोक्‍यात जाऊ देऊ नका' असे म्हणत बाळासाहेबांनी हाताला धरत छातीशी कवटाळले माझ्यासाठी हा प्रसंग अविस्मरणीय होता.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन या निमित्ताने जुने शिवसैनिक व पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय सिरसाट यांनी सरकारनामाशी बोलतांना बाळासाहेबांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या साहेबांनी माझ्यासारखे हजारो, लोखो कट्टर शिवसैनिक या महाराष्ट्रात घडवले. त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा प्रसंग देखील माझ्या नशिबी आला हे सांगतांना सिरसाट यांना गहिवरून आले.
बाळासाहेब ठाकरे यांचे या शहराशी अतूट नाते होते, त्यामुळे दौरे, प्रचार सभा, मेळाव्यांच्या निमित्ताने त्यांचे इकडे नेहमी येणे व्हायचे. अनेकांनी त्यांना जाहीर सभेत भाषण करतांना पाहिले आहे, पण मला प्रत्यक्षात त्यांचा सहवास लाभला. औरंगाबादेत शिवसेना जोर धरत असतांना जातीय दंगल उसळली. शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि त्याने नेटाने शत्रूचा मुकाबला केला. अनेकांना अटक झाली काहीजणांवर रासुकाखाली कारवाई देखील झाली. तत्कालीन जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांना पोलिसांनी रासुकाखाली अकोला कारागृहात डांबले होते. शिक्षा संपल्यानंतर मी आणि पाटील दोघेही थेट अकोल्याहून मुंबईला शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो. बाळासाहेब हॉलमध्ये बसलेले होते. आम्ही त्यांच्या पाया पडलो आणि सुभाष पाटलांनी हा संजय सिरसाट दलित समाजाचा कार्यकर्ता शिवसेनेसोबत काम करतो अशी माझी ओळख करून दिली.
दलित समाजाचा हा उल्लेख बाळासाहेबांना काही आवडला नाही, त्यांनी लगेच सुभाष पाटील यांना " शिवसेना कधी जात-पात मानत नाही, तुम्हीही डोक्‍यातून जात काढून टाका अशा शब्दांत खडसावले. मी संजयला ओळखतो असे म्हणत त्यांना मला हदयाशी कवटाळले. एखाद्या सामान्य शिवसैनिकावर देखील वडीलांसारखी माया करणारे बाळासाहेब होते. मराठावाडा सांस्कृतिक मंडळावरील त्यांच्या अनेक जाहीर सभांमध्ये मला सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती.
बालशिवसैनिकालाही तोच मान..
मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीला गेलो त्या वेळचा आणखी एक प्रसंग मला आठवतो. आमची विचारपूस करत असतांनाच बंगल्याच्या गेटवरून सिक्‍युरीटी गार्डचा साहेबांना फोन आला. " उस्मानाबाद जिल्ह्यातून एक आठ-नऊ वर्षाचा मुलगा तुम्हाला भेटायचा हट्ट करतोय. तो बऱ्याच वेळापासून गेटवर उभा आहे, बाळासाहेबांना भेटल्याशिवाय जाणार नाही अस म्हणतोय. तेव्हा बाळासाहेबांनी क्षणाचा विलंब न लावता त्या लहान मुलाला आत बोलवून घेतले. त्याच्या डोक्‍यावर मायेने हात फिरवला. तू कसा, कुठून आलास, कशासाठी आला अशी विचारणा केली. मला फक्त तुम्हाला भेटायचे होते म्हणून मी उस्मानाबादहून बसने आलो असे त्या मुलाने सांगितले.
तेवढ्यात हॉलमध्ये मॉसाहेब (मीनाताई ठाकरे) आल्या. त्यांना बघून बाळासाहेब म्हणाले, तुम्ही मला नेहमी विचारता ना ? की दौरे, आणि महाराष्ट्रभर फिरून तुम्हाला काय मिळते, त्याचे उत्तर हा लहान मुलगा आहे. केवळ मला भेटायला म्हणून तो मराठवाठ्यातून मुंबईत आला आहे. हीच माझी कमाई असल्याचे सांगत बाळासाहेबांनी त्या बालशिवसैनिकाला कडेवर उचलून घेतले. त्याला जेवू-खाऊ घातले, त्याची सुरक्षित पुन्हा गावी जाण्याची व्यवस्था करून दिली. हे प्रसंग बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व किती मोठे आणि महान होते हे दर्शवते. साहेब आज आमच्या सोबत नसले तरी त्यांचे आशिर्वाद आणि विचार सदैव पाठीशी राहतील अशी भावना देखील संजय सिरसाट यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post