आठवण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची...

१९८२ साली माझी शिवसेनाप्रमुख_बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पहिली भेट झाली. निमित्त होते माझ्या लॅमिंग्टन रोडवरील ऑफिसच्या उद्घाटनाचे. मी म्हणालो, साहेब, लॅमिंग्टन रोड येथील इलेक्ट्रॉक्स मार्केटमध्ये मी स्वत:चे ऑफिस सुरू करतो आहे. साहेबांना आश्चर्य वाटले, लॅमिंग्टन रोड म्हणजे प्रामुख्याने गुजराथी, सिंधी अशा इतर भाषकांचे व्यवसाय असणारा परिसर. अशा ठिकाणी मराठी माणूस स्वत:चे ऑफिस सुरू करतो, याचा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. साहेबांनी माझ्या व्यवसायाची माहिती घेतली. लॅमिंग्टन रस्त्यावरील मराठी माणसाचे एकमेव ऑफिस. त्यामुळे साहेबांनी उद्घाटनाला येण्यासाठी तत्काळ होकार दिला. बाहेर खूप मोठी गर्दी असतानाही साहेबांनी माझी आस्थेने चौकशी केली. तो क्षण माझ्या दृष्टीने संस्मरणीय होता. यानंतर थेट संपर्क आला तो सन १९९५ मध्ये. राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. त्यावेळी जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉर्मसचा मी कार्याध्यक्ष होतो. उद्योगपती श्यामराव चौगुले यांनी उद्योगक्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. या समारंभास झी टीव्हीचे मालक, अनेक उद्योगपती, प्रीतीश नंदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते. या समारंभास शिवसेनाप्रमुखही आले होते. त्यावेळी या बड्या उद्योगपती, पत्रकार व नेत्यांच्या गर्दीतही शिवसेनाप्रमुखांनी माझी जातीने चौकशी केली. एक मराठी माणूस म्हणून मी केलेल्या प्रगतीची ते इतरांना माहिती देत होते. यावेळी झी टीव्हीच्या मालकांना त्यांनी तुम्ही टीव्हीवर अशा व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारा कार्यक्रम सादर करा. तरुणांना आढळराव पाटील यांच्यासारख्या तळागाळातून येऊन प्रगती केलेल्या उद्योजकांपासून प्रेरणा मिळेल. त्यांनी त्यावेळी माझ्याबाबत जो जिव्हाळा, प्रेम दाखविले ते मी कधीच विसरू शकत नाही.
माझ्या 'अनाहत' या आत्मचरित्राचे लेखन झाले होते. मी शिवसेनाप्रमुखांना प्रस्तावना देण्याची विनंती केली. ते म्हणाले, खरंतर आत्मचरित्र हा प्रकार मला आवडत नाही. कारण त्यात स्वत:ची स्तुती व इतरांवर दोषारोप असतात. पण तुमचे तसे नाही. तुमच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास शब्दरूपानं आल्यास त्याचा तरुण पिढीला उपयोगच होईल. असं म्हणत त्यांनी प्रस्तावना देण्यास संमती दिली. त्यांनी माझ्या आत्मचरित्रासाठी दिलेली प्रस्तावना म्हणजे त्यांनी मला दिलेलं प्रशस्तिपत्रकच म्हणावे लागेल. माझ्या सुरुवातीपासूनची धडपड व उद्योजकापर्यंत प्रवास याचा सुंदर आढावा घेत त्यांनी 'अनाहत' हे केवळ पुस्तक नसून, तरुणांना प्रेरणा देणारी ही संघर्षगाथा आहे, असे सांगत यश मिळवत असतानाही पाय जमिनीवर असल्याचे नमूद केले होते. याचा अर्थ आपल्या सहकार्यांची त्यांच्याजवळ पूर्ण माहिती असते हे दिसून येते.

सन २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होती. मी शिवसेनेत प्रवेश करायचा की नाही, या द्विधा मन:स्थितीत होतो. कार्यकर्ते व माझ्या सहकार्यांचे माझ्यावर खूप दडपण होते. अखेरीस मी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला आणि मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीस गेलो. साहेबांनी माझी आस्थेने चौकशी केली. त्यावेळी मी म्हणालो, साहेब, मी शिवसेनेत प्रवेश करतो; परंतु मी निवडून येईन याची खात्री नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही. यावर साहेब लगेचच म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. मी संपूर्ण चौकशी केली आहे. जनमत तुमच्या पाठीशी आहे. तुम्हीच निवडून येणार. चला, तयारीला लागा. त्यानंतर मी मातोश्री बंगल्यातून बाहेर पडत असताना साहेबांनी पुन्हा बोलावले अन् म्हणाले, आढळराव, तीन महिने राहिले आहेत. जोमाने तयारीला लागा. तुम्हीच निवडून येणार आहात. तेव्हा आतापासूनच तुमच्या पत्नीला तुमची दिल्लीची बॅग भरून तयार ठेवायला सांगा. साहेबांचे ते उद्गार ऐकल्यानंतर मात्र मी द्विधा मन:स्थितीतून बाहेर आलो. आता लढायचे अन् जिंकायचेच या ईर्षेने तयारीला लागलो. निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांची जाहीर सभा चाकणला ठेवली होती. सभेला 'न भूतो न भविष्यती' अशी गर्दी झाली होती. चाकणची सभा खर्या अर्थाने ऐतिहासिक होती. माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी सभा असे वर्णन करावे लागेल अशी ती सभा होती.

पण तरीही माझ्यावर एक वेगळेच दडपण होते. ते म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत भाषण करण्याचं. ज्यानं महाराष्ट्राच्या जनतेवर आपल्या तेजस्वी वाणीनं अधिराज्य गाजवलं, त्या शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत भाषण करायचं या कल्पनेनंच मी अस्वस्थ होतो; परंतु शिवसेनाप्रमुखांचा स्पर्श व आशीर्वादानं मला हे बळ दिलं. माझ्या दृष्टीने हा क्षण अतिशय महत्त्वाचा होता.

निवडून आल्यावर मी शिवसेनाप्रमुखांना दूरध्वनीवरून विजयाची बातमी सांगितली. त्यावेळी ते म्हणाले, आढळराव, तुम्ही खूप मोठय़ा माणसाला पाडले आहे. आता हा मतदारसंघ तुमच्या ताब्यात. यापुढे तुम्ही कायमच इथून निवडून येणार, असा आशीर्वादही दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की, सर्वसामान्यांना त्यांचा दरारा दिसतो; परंतु त्यांच्या सान्निध्यात एखादी व्यक्ती आली की, मात्र त्यांच्यातील मिस्कील माणूस, आपल्या सहकार्यांची व शिवसैनिकांची सातत्याने काळजी करणारा नेता दिसून येतो. एखादी व्यक्ती त्यांच्या सान्निध्यात आली तर ती त्यांच्यावर फक्त प्रेमच करेल, असे त्यांचे वागणे, बोलणे असे.

शिवसेना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेकदा मी साहेबांना भेटलो. प्रत्येकवेळी त्यांच्याकडून नवी प्रेरणा, नवी ऊर्जा घेऊन निघत असे. त्यांचे व्यक्तिमत्त्वच प्रेरणादायी होते. शिवसेनाप्रमुख म्हणून साहेब जितके मोठे होते, तितकेच जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख समाजमनाला भावणारी होती.

माझ्या ८-९ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी सातत्याने मला आधार दिला. प्रत्येकवेळी माझी चौकशी केली. माझ्या पाच वर्षांच्या कार्याचा अहवाल प्रकाशित करण्यासाठी मी त्यांच्याकडे संदेश मागितला, त्यावेळीही त्यांनी आवर्जून माझ्या कामांची माहिती घेतली अन् शाबासकीही दिली.

गतवर्षी १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. एक धगधगते अग्निकुंड शांत झाले. त्यांच्या महानिर्वाणानं एका युगाचा अंत झाला. पण माझ्या दृष्टीने विचार केला तर शिवसेनाप्रमुखांचे विचार अनंत काळ टिकणारे आहेत. त्यांचे स्मरण, त्यांची छबी कायमच आम्हाला प्रेरणा देते अन् देत राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post