शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संयुक्त बैठकीत युतीच्या घोषणेबरोबरच नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. मंगळवारी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याबद्दल पत्रकार परिषदेत पेढे वाटले.

शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत म्हणाले की, ‘रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पहिल्यापासून संघर्ष करत होती. स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन रिफायनरी रद्द करण्याची घोषणा केली होती. सोमवारी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संयुक्त बैठकीत नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची शिवसेनेची मागणी भाजपने मान्य केली. रिफायनरी प्रकल्प रद्द होणार हे निश्चित आहे. प्रकल्प रद्दची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थित केली, त्यामुळे अन्य कागदोपत्री कार्यवाही लवकरच होईल आणि हा प्रकल्प आता शंभर टक्के रद्द झाला आहे, असे विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, क्षेत्रप्रमुख जया माने व इतर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post