कल्याण- भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कल्याण-डोंबिवलीत हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी डोंबिवलीत रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीच्या काचा फोडल्या. कल्याणच्या पत्री पुलावर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. संतप्त जमावाने कल्याण पश्चिमेतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा तोडल्याचे वृत्त आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे.
घाटकोपरमध्ये तणाव
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनाला घाटकोपरमध्ये हिंसक वळण लागले आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या मागे जाळपोळ करण्यात आली आहे. काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत. आरसिटी मॉलच्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दादरमधील आंदोलन समाप्त
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेल रोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाडयात ही रॅली आल्यानंतर मोठया संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामात परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी काहीवेळासाठ रास्ता रोको आंदोलन केले.
Post a Comment