हिंदुत्वचा प्रसार करण्यासाठी राजकीय शक्ती पाहिजे. यासाठी आपण भाजपशी संपर्क साधला होता पण भाजपच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. हिंदुत्वाचा प्रसार आणि पूर्णपणे स्वीकार करणारा एकमेव पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे, यासाठी आपण शिवसेनेशी संपर्क साधला आणि त्यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. यामुळेच महाराष्ट्रातील हा पक्ष कर्नाटकात आणून हिंदुत्वाला बळकटी देण्याचा आपला प्रयत्न राहील.
अशी माहिती देताहेत कर्नाटकातील हिंदुत्ववादी नेते आणि श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक. त्यांच्या शिवसेना प्रवेशाची सर्वत्र चर्चा सुरू असताना मुतालिक यांनी बेळगाव live च्या प्रतिनिधींशी बोलताना मोठा उलगडा केला आहे.
शिवसेनेशी आपली बोलणी सुरू आहेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपण एकदा भेट घेतली आहे. अजून अंतिम निर्णय होण्यास एक आठवडा लागेल, उध्दवजींची आणखी भेट घेण्यासंदर्भात सूचना आल्यानंतर सर्व निर्णय होतील. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
आज हिंदुत्व वाचवण्याची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेना हा एकमेव पर्याय आपणा समोर उभा आहे, त्या पक्षाचा प्रमुख मुद्दा हिंदुत्व असल्याने आपण हा पक्ष कर्नाटकात घेऊन येणार आहोत. शिवसेना महाराष्ट्रात मराठीसाठी लढते मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष हिंदुत्वासाठीच काढला आहे यामुळे कर्नाटकात हिंदूंचा आवाज म्हणून हा पक्ष उभा राहू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी मांडला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post