उद्धव ठाकरे हे २००० च्या दशकातील शिवसेनेच्या राजकारणात आल्यानंतर काहीच वर्षात पक्षांतर्गत अत्यंत कठीण परिस्थितीला सामारे जाऊन तावून सुलाखून निघालेले आणि आज पक्षावर एकतर्फी कमांड ठेवणारे आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव नेता म्हणता येईल.
खरेतर २०१४ च्या निवडणूकीत शिवसेनेची अग्निपरीक्षा झाली. या अग्निपरीक्षेत पक्षाची अवस्था काय असेल हे कुणालाच समजत नव्हते. बाळासाहेबांच्या निधनापश्चात होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक होती. एकाबाजूला लोकसभेत पाशवी बहुमत मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपसमोर टिकायचे होते त्याचवेळी स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांना बळ द्यायचे होते.
त्याचवेळी या संयमी नेत्याने शिवसैनिकांमध्ये अक्षरशः आत्मविश्वास जागवून भाजप अत्युच्च यशाच्या शिखरावर असताना ६३ आमदार निवडून आणून महाराष्ट्रात भाजपला बहुमतापासून रोखले.
भाजपच्या विरोधात जो कुणी जातो त्याची बदनामी करुन त्याचा आत्मविश्वास कमी करण्याची चाल भाजप नेहमीच खेळते तेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत भाजपने केले पण शिवसैनिकांच्या आक्रमणासमोर भाजपने अक्षरशः नांगी टाकली.
सन २००५ साली शिवसेनेचे आक्रमक नेते असलेले नारायण राणे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे बाळासाहेबांनी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली इथूनच उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाच्या परीक्षेला सुरुवात झाली.
शिवसेनेतून नारायण राणेंसोबत गेलेल्या आमदारांच्या विधानसभांमध्ये एकापाठोपाठ एक असे पराभव शिवसेनेला पचवावे लागले. पराभवाचे लोण सिंधुदुर्गातून सुरु झाले होते ते श्रीवर्धनच्या सीमेवर रोखण्यात उद्धव ठाकरेंना यश आले. त्यानंतर विदर्भात लोकसभा पोटनिवडणूकीत सुबोध मोहीतेचा पराभव करुन शिवसेनेच्या या संयमी नेतृत्वाने थोड्याफार प्रमाणात स्वतःचा आत्मविश्वास उंचावण्यात यश मिळवले.
२००६ साली म्हणजेच नारायण राणे फुटल्यानंतर ज्यांच्याकडे शिवसेनेचे भविष्य म्हणून पाहिले जात होते त्या राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन जबरदस्त मोठे संकट शिवसेनेवर ओढवले.
शिवसेना सोडून जात असताना शक्यतो उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर टिका करुन अनेकजण शिवसेना सोडू लागले. त्यावेळी बाऴासाहेबांच्या हजेरीत शिवसेनेची ही अवस्था असेल तर बाळासाहेबांच्या पाठीमागे शिवसेना संपलेली पहायला मिळेल अशी कुजबुज करायला लोकांनी सुरुवात केली होती.
उद्धव ठाकरेंकडे कुणीही आक्रमक नेता म्हणून पहात नाही. परंतु त्यांच्या कमालीच्या संयमाने अनेकांना घायाळ करुन सोडले आहे. तोंडाची बडबड न करता जे काही होत असेल त्याकडे धीरोदत्तपणे पाहणे आणि गप्प बसूनच उद्धव ठाकरेंनी अनेक संकटांवर लिलया मात केली आहे.
सुरुवातीच्या काळात राज–राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिका करुन यश मिळवले असले तरी या दोघांची आजची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंशी कुठल्याही बाबतीत तुलना करण्याइतकीही कुवत या दोघांमध्ये उरलेली नाही.
राणेंबरोबर गेलेल्या अपवाद वगळता सर्वच आमदारांना निवडून आणून राणेंनी त्यांचा दबदबा निर्माण केला परंतु २०१४ उजडेपर्यंत राणेंना स्वतःची आमदारकी वाचवणेही कठीण झाले आणि २०१४ या एका वर्षात दोनदा शिवसेनेकडून पराभवाची नामु्ष्की पत्करण्याची वेळ आली.
२००९ च्या पहिल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला धुळ चारुन तब्बल १३ आमदार आणि २०१२ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत २९ नगरसेवक निवडून आणून मनसेने शिवसेनेचा कंबरडा मोडला होता. परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणूकीतील राज ठाकरेंच्या फाजिल आत्मविश्वासाचा उद्धव ठाकरेंनी नेमका फायदा घेतला आणि विधानसभेच्या निवडणूकीत मनसेला मुंबईतून हद्दपार केला.
२०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात असतानाही मनसेला केवळ सात नगरसेवक जिंकून आणता आले परंतु काही दिवसांतच ७ पैकी ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देऊन उद्धव ठाकरेंनी राजकारणात राज ठाकरेंना अक्षरशः लोळवले.
शिवसेना भाजपसोबत राज्यसरकारमध्ये एकत्र असली तरी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या न पटणाऱ्या गोष्टींवर कायम ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनी विरोधीपक्षाची भुमिका निभावल्याने भाजपची पोटदुखी सुरु झालेली आहे.
भाजप नेहमीच त्यांच्या विरोधकांवर घाणेरडी बदनामी करण्याचे तंत्र अवलंबिते. राज्य सरकारचा गाढा ओढताना शिवसेनेने भाजपच्या नाकी नऊ आणल्याचे जगजाहिर आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सलोख्यामुळे ही लढाई एका मर्यादेपर्यंत थांबत होती.
२०१९ ची लोकसभेची लढाई भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे. २०१४ ला मोदीसरकार आल्यापासून बहुमत असूनही विशेष कामगिरी करण्यात मोदींना अपयश आलेले आहे. त्यातून भारतीय जनतेत नाराजी पसलेली असतानाच शिवसेनेशी लोकसभेला युती करण्याची घाई भाजपला लागली आहे.
२०१७ च्या महानगरपालिका प्रचारावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती न करण्याचे जाहिर केलेले असताना शिवसेना युती करेल असे फसवे चित्र उभे करण्याचे काम भाजपच्या महाराष्ट्र आणि केंद्रीय नेतृत्वाकडून केले गेले. परंतु उद्धव ठाकरे आपल्या मतावर ठाम राहून युतीचा इन्कार करत राहिले.
तरीही वारंवार युतीच्या पुड्या सोडून जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम भाजपकडून सुरुच होते. भाजपला खरे तर आजच्या परिस्थितीत मागच्या चार वर्षात कधी नव्हती इतकी शिवसेनेची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणूकीत मोदींची परिस्थिती हालाखीची असून आताची संख्या राखता आली नाही तरी किमान सन्मानजनक आकडा महाराष्ट्रात राखता आला पाहिजे यासाठी आता शिवसेनेची गरज जाणवू लागली आहे.
उद्धव ठाकरेंना भाजपच्या या गरजेची बिल्कुल चिंता नाही. मोदींसाठी रात्रंदिवस मेहनत करुन पंतप्रधानपदी जिंकून आणणाऱ्या शिवसेनेला मोदी आणि अमित शहाकडून जी वागणूक दिली त्याचे उट्टे फेडण्याची वेळ शिवसेनेकडे आलेली असल्याची पक्की खात्री उद्धव ठाकरेंना आलेली आहे.
त्यातच भाजपचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूपश्चात लागलेल्या पोटनिवडणूकीपूर्वी वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपचा अहंकार दुखावला गेला आहे. युतीचा साफ इन्कार करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जो काही संदेश भाजपला द्यायचा होता तो त्यांनी दिलेला आहे. परिणामी शिवसेना भाजपशी युती करण्यास तयार होईल याची शक्यता आता भाजपला धुसर वाटू लागली आहे.
आपल्या मतावर ठाम राहून काम करण्याची उद्धव ठाकरेंची शैली अजूनपर्यंत भाजपच्या लक्षात आलेली नाही की माहित असून त्याकडे दुर्लक्ष भाजप करीत आहे याबद्दल कळत नसले तरी भाजपच्या या नाजूक वेळेचा फायदा उद्धव ठाकरे त्यांच्या संयमी स्वभावाने घेत आहेत.
राज आणि राणे यांचे हिशेब पुर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरेंना आता भाजपचे हिशेब पुर्ण करायचे आहेत. राज आणि राणे यांच्यावर उद्धव ठाकरे मात करतील असे त्यावेळी अगदी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तिलाही वाटले नव्हते परंतु ते त्यांनी साध्य केले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंची गाठ बलाढ्य भाजपशी असून जिथे कॉंग्रेससारखा पक्ष हातपाय गाळून बसलेला आहे तिथे उद्धव ठाकरे ठाण मांडून भाजपचा मुकाबला करत आहेत.
यश नेहमीच शुराला साथ देते त्याचप्रमाणे भाजपकडून वारंवार चुका होण्याचे प्रकार मागच्या काही काळात दिसू लागले आहेत. त्याचा पुर्ण फायदा उद्धव ठाकरे उचलत आहेत. पुढील लढाई ही शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्वाची आणि निर्णायक असणार आहे. उद्धव ठाकरेंसारखा संयमाने लढणारा नेता असल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना साथ देणे अभिप्रेत आहे.
बाळासाहेबांचे नाव घेतल्यानंतर उसळणारा शिवसैनिक आज उध्दव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहून शिवसेनेला आणि त्यांच्या नेत्याला भाजपविरोधातील लढाईसाठी पुर्ण साथ देईलच. शिवसैनिक जेव्हा एखाद्या लढाईला पुर्ण ताकदीने उभा राहतो तेव्हा भलेभले समोर आडवे झाल्याचा इतिहास आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या संयमाच्या जोरावर शिवसैनिकांच्या साथीने भाजपविरोधातील लढाईत यशस्वी होतील काय ही मराठी माणसालाही उत्सुकता लागून राहिलेली आहे.
Nakki hoil amhi shivsainik uddhav sahebanchya barobar chaticha coat karun maidanat ahot.
ReplyDeletePost a Comment