मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे येत्या १९ जून शिवसेना वर्धापन दिनी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांत शिशिर शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांचा शिवसेना पक्षातील मार्ग मोकळा झालाय.
शिशिर शिंदे शिवसेनेचे माजी उपनेते होते. पण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांच्या सोबत गेलेल्या शिलेदारांपैकी शिशिर शिंदे एक होते. मात्र २०१७ महापालिका निवडणुकीत शिशिर शिंदे यांना पक्षाने डावललं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या शिशिर शिंदे यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. शिशिर शिंदे यांच्या घर वापसीमुळे मुलुंड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची पोकळी भरून निघणार अशी शिवसेनेत चर्चा सुरू आहे.
शिशिर शिंदेंची कारकीर्द
१) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक.
२) शिवसेनेत २४ वर्षे विविध पदांवर कार्यरत.
३) १९९२ साली वानखेडे स्टेडियमवरील भारत X पाकिस्तान क्रिकेट सामन्याची खेळपट्टी उखडून टाकणारे नेते.
४) शिवसेनेतून विधान परिषदेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात अपयशी ठरले होते.
५) राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सोडणारे शिलेदार.
६) २००९ साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना कडवी झुंज दिली. संजय पाटील यांचा अवघ्या ३००० मतांनी निसटता विजय झाला होता. किरीट सोमय्या यांचा पराभव शिशिर शिंदे यांना मिळालेल्या मतांमुळे झाला होता.
७) २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भांडुप विधानसभा मतदारसंघातून विजयी.
८) २०१४ साली भांडुप विधानसभा निवडणुकीत पराभव.
९) २०१७ साली मुंबई महापालिका निवडणुक निर्णय प्रक्रियेत डावलल्यामुळे, मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा.
१०) येत्या १९ जून शिवसेना वर्धापन दिनी शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश करणार
Post a Comment