महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे बांधकाम अपूर्ण असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या इमारतीच्या उद्‌घाटनाचा घाट घातला होता. मात्र, पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून उद्‌घाटन करावे, अन्यथा उद्‌घाटन कार्यक्रम उधळून लावण्याच इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत घाडगे यांनी दिला.

शिवसेनेच्या इशाराला घाबरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे. उद्या (गुरूवार) औपचारीकरित्या इमारतीत प्रवेश करून कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाबळेश्‍वर येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पाऊस सुरू होण्याआधी या कामाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपूर्ण काम असलेल्या या इमारतीचे उद्‌घाटन राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाची माहिती शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समजताच ते संतापले. तालुका प्रमुख यशवंत घाडगे यांनी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह गटविकास अधिकारी दिलीप शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

इमारत उद्‌घाटनाचा कार्यक्रम घाई गडबडीत घेऊ नये. अन्यथा हा कार्यक्रम शिवसेना उधळुन लावेल, असा इशारा दिला. इमारतीचे काम अर्धवट झाले आहे. सध्या ज्या इमारतीत पंचायत समितीचे कामकाज चालते तेथे पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना खुप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ पुजा करून इमारतीचा वापर सुरू करावा. पावसाळ्यानंतर इमारतीचे काम पूर्ण होईल, त्यावेळी महाबळेश्‍वर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह सर्व पक्षिय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली.

Post a Comment

Previous Post Next Post