मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाली होती, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर केला.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आपण केवळ सही केल्याचं भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांनी या विधानाद्वारे बाळासाहेबांची अटक ही युती सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या फाईलमुळे झाल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. या दंगलीच्या तपासासाठी जस्टीस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केली, असं भुजबळ म्हणाले. एका अग्रलेखाच्या प्रकरणावरुन 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती.

''गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,'' असं भुजबळ म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post