मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी संभाजी भिडेंच्या आंब्यावरील विधानाचा समाचार घेणारं व्यंगचित्र काल प्रसिद्ध केलं होतं. आता याच व्यंगचित्रातून राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे. सध्या हे व्यंगचित्राचं दुसरं व्हर्जन चांगलंच व्हायरल झालं आहे. 'बारामतीचा पोपट' असं म्हणत या व्यंगचित्रातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
माझ्या बागेतील आंबा खाल्ल्यानं अपत्यप्राप्ती होते, असं विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून समाचार घेतला होता. यानंतर आता सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला त्यांच्याच व्यंगचित्रातून उत्तर देण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या होत्या. त्यातील एका बाईच्या हातात बाळ होतं. या बाळाच्या तोंडाच्याजागी आंबा दाखवण्यात आला होता. या बाळाला पाहून दुसरी बाई 'अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं', असं म्हणताना दिसत होती.
आता राज ठाकरेंची खिल्ली उडवणाऱ्या छायाचित्रातही दोन महिला आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात बाळ असून दुसरी महिला 'अय्या! बारामतीच्या बागेतून आलेला पोपट वाटतं', असं म्हणताना दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्याच संदर्भानं राज ठाकरेंवर ही टीका करण्यात आली आहे.
Post a Comment