सांगली : महाराष्ट्रात १ जानेवारीला जो ‘बंद’ पुकारण्यात आला आणि त्यानंतर जी दंगल घडली, त्या सर्व परिस्थितीस प्रकाश आंबेडकर हेच उत्तरदायी आहेत. दंगलीपूर्वी ३१ डिसेंबरला पुणे येथे जी एल्गार परिषद झाली, त्या परिषदेतील वक्त्यांची भाषणे जातीय दंगल घडवण्याच्या उद्देशानेच करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वनियोजित अशी दंगल घडवण्यास कारणीभूत असणारे  प्रकाश आंबेडकर, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांना तात्काळ अटक करण्यात यावी. याच समवेत दंगलीतील कटाचे मूळ सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी २८ मार्चला प्रत्येक जिल्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी १९ मार्च या दिवशी सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्वश्री अविनाशबापू सावंत, मिलिंद तानवडे आणि नितीन चौगुले उपस्थित होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की,

१. मी गेली ४ वर्षे कोरेगाव भीमा येथे गेलेलो नसतांना दंगल घडवल्याचा माझ्यावर होणारा आरोप अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे दंगलीत मी होतो आणि दगड मारल्याचा जो आरोप करणारी महिला आहे, तिचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांना माझे नाव घेण्यास भाग पाडणारी संघटना अथवा व्यक्ती कोणती असावी, याचे अन्वेषण सरकारने करावे.

२. या प्रकरणातील दंगलीची हानीभरपाई शासनाने करणे म्हणजे दंगलीला खतपाणी घातल्यासारखे आहे. यापूर्वी झालेल्या दंगलींमध्ये शासनाने संबंधितांकडून दंड वसूल केला आहे. त्यामुळे १९८४ पी.डी.पी.पी. कायद्यानुसार सरकारने ही हानीभरपाई प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून वसूल करावी.

३. नक्षलवादी डाव्या विचारसरणीशी प्रकाश आंबेडकर यांचे संबंध पहाता हा कट आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनीच केल्याचा आमचा संशय आहे.

४. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र आणि देशाचा कोणीही विचार करत नसून या प्रकरणामुळे राष्ट्राची मोठी हानी होत आहे.

५. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदनंतर महाराष्ट्राची काय अवस्था झाली ते पहाता, २६ मार्च या दिवशीच्या त्यांच्या आंदोलनास शासनाने अनुमती नाकारावी.

६. माझ्यावर होणारे आरोप म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष दलितांच्या मतांचा वापर करून घेत आहेत; मात्र यातून प्रश्‍न अधिकच चिघळत आहे.

७. प्रकाश आंबेडकर हे विद्वेषाचे राजकारण करत असून ते माझी अपकीर्ती करण्याचे ते षड्यंत्र आहे.

या वेळी श्री. नितीन चौगुले म्हणाले की,

१. राहुल फटांगडे या युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला सदरा परिधान केल्याने त्याची हत्या करण्यात आली. त्या मारेकर्‍यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.

२. २८ मार्चच्या जिल्हानिहाय होणार्‍या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास पू. भिडेगुरुजी सांगतील त्याप्रमाणे या आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल. हे आंदोलन चालू असतांना श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सर्व उपक्रम चालूच रहातील.

मिलिंद एकबोटे यांना अटक करणे चुकीचे !

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात श्री. मिलिंद एकबोटे यांना अटक करणे पूर्णत: चुकीचे आहे; कारण या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे पू. भिडेगुरुजी या वेळी म्हणाले.

सत्य बाहेर येण्यासाठी आंबेडकर, मेवाणी यांचे ब्रेन मॅपिंग करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

या प्रकरणात मी कोणत्याही अन्वेषणास जाण्यास सिद्ध आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी शासनाला जी अत्याधुनिक साधने वापरून अन्वेषण करणे शक्य आहे, ते करावे. माझ्यासह अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील या सर्वांचेच ब्रेन मॅपिंग करावे, म्हणजे प्रकरणातील सत्य बाहेर येईल.

सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्याविषयी पत्रकारांमध्येही आश्‍चर्य !

पू. भिडेगुरुजी हे या प्रकरणात दोषी नाहीत, अशी सांगलीतील पत्रकारांचीही भावना आहे. एकूणच पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांमध्येही ‘सरकार या प्रकरणात समोर येऊन काही भूमिका का मांडत नाही’, असाच प्रश्‍न वारंवार उपस्थित होत होता.

Post a Comment

Previous Post Next Post