दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘बागी २’ शुक्रवारी (३० मार्च) रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत या चित्रपटाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’लाही मागे टाकलं. या अभूतपूर्व यशानंतर दिशा आणि टायगरवर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिशाचा हा दुसराच चित्रपट असून प्रेक्षकांकडून मिळणारा भरभरून पाहून ती अत्यंत आनंदी आहे. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली ही अभिनेत्री सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी दिशाने बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे.
नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. करिअरच्या सुरुवातीलाच निराशा तिच्या पदरात कशाप्रकारे पडली, मुंबईत आल्यानंतर काम मिळवण्यासाठी तिने धडपड कशी केली, हे सर्व तिने सांगितले. ‘एका चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. पण ऐनवेळी माझ्याऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीला त्यात घेण्यात आलं. तो माझ्या पहिलाच चित्रपट होता. पण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. नकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळालं. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, तेव्हा त्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेता,’ असं ती म्हणाली.
अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने अर्ध्यावरच शिक्षण सोडल्याचं स्पष्ट केलं. ‘शिक्षण अर्धवट सोडून मी मुंबईला आली. कोणत्याही ओळखीशिवाय एका नवीन शहरात येऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही. मी एकटीच राहत होती आणि स्वत:च्या खर्चासाठी कधीच कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाही. फक्त ५०० रुपये घेऊन मी मुंबईत आली होती आणि एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी मी खूप फिरले. काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ याचा सतत ताण माझ्यावर होता,’ असं तिने सांगितलं.
सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला वाहवा मिळाली. टायगरसोबत तिच्या रिलेशनशिपचीही बरीच चर्चा रंगली. या दोघांच्याही केमिस्ट्रीचा फायदा ‘बागी २’ या चित्रपटाला होत आहे यात काही शंका नाही. येत्या काळात हा चित्रपट कमाईचे आणखी कोणते विक्रम मोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
Post a Comment