३० ऑक्टोबर १९६६ या तारखेला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवाजी पार्कवरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायत कायम आहे.२००५ मध्ये झालेल्या मेळाव्याला शिवसेनाप्रमुख, उद्धव व राज एकाच ठिकाणी होते. पावसामुळे २००६ चा मेळावा रद्द झाला होता.

मराठी माणसाला बाळासाहेबांनी असे दिले आमंत्रण..
"स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. ‘जय महाराष्ट्र’!”
आणि व्यंगचित्र होते की अपेक्षाभंग, अन्याय, उपऱ्यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणाऱ्या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे. या एका बातमीमुळे आणि व्यंगचित्रातील आशयामुळे ३० तारखेच्या मेळाव्याला शिवाजी पार्कवर चार लाख मराठी जनता गोळा झाली.
तो दिवस होता ३० ऑक्टोबर १९६६ चा, विजयादशमीचा! मुंबईच्या शिवाजी पार्ककडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिलंगणाचं पहिलं सोनं लुटण्याचा दिवस. मुंबईतला सारा मराठी माणूस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटला ! गर्दीचे लोंढे सुरूच होते. तब्बल चार लाख लोक या सभेला उपस्थित होते ! तरीही लोकांचे जत्थेच्या जत्थे येतच होते अन सायंकाळी साडेपाचच्या  सुमारास ती ऐतिहासिक सभा सुरु झाली.

शिवसेनेच्या या मेळाव्याप्रसंगी व्यायामशाळांच्या कसरतीचे अप्रतिम प्रयोग झाले. श्री. बाळासाहेब ठाकरे, रामराव आदिक आदींनी या व्यायाम कसरतीच्या प्रयोगाचा आनंद लुटला. सुप्रसिद्ध संगीतकार वसंतराव देसाई यांनी समरगीत गाऊन वातावरण धुंद केले तर शाहीर साबळे आणि पार्टीने महाराष्ट्र गीताने मराठी माणसांत एक चैतन्य निर्माण केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी व्यासपीठावरील शिवप्रभूंच्या पुतळ्याला वंदन केले. भाषणात प्रबोधनकारांनी आपल्या ‘ठाकरी’ भाषेत विरोधकांचा समाचार घेतला. ‘अरे सामोपचाराच्या गोष्टी गांडूंनी कराव्यात! मर्दांचं ते काम नव्हे! महाराष्ट्र हा काय लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे. या वाघाला कुणी डिवचलं..!!

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post