शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात झंझावाती दौरा केला. कर्जमाफीची आग्रही भूमिका मांडल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीसाठी शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवक तसेच अन्य लोकप्रतिनिधींना आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आवाहन केले. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी जमा केलेल्या निधीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दहा लाखांची मदत करीत तब्बल दोन कोटींचा मदतनिधी जमा झाला. या निधीचा दोन कोटी रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधी’साठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मदतनिधीसाठी उद्धव ठाकरे यांचे आभार
शिवसेनेने शेतकरी सहाय्यता निधीसाठी दोन कोटी रुपये दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. या मदतनिधीमुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेली शिवसेना आणि संपूर्ण सरकारच त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश शेतकऱयांपर्यंत पोहोचेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
Post a Comment